Mon, May 25, 2020 03:29होमपेज › Goa › शिवसेना राज्यात स्वतंत्रपणे लोकसभा लढवणार

शिवसेना राज्यात स्वतंत्रपणे लोकसभा लढवणार

Published On: Feb 27 2018 12:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

 शिवसेना  गोव्यात लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. त्यादिशेने शिवसेनेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीस गोवा दौर्‍यावर  येतील,  असे  खासदार तथा गोवा प्रभारी संजय राऊत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या राजकारणात मोठे योगदान आहे. पर्रीकर सध्या आजारी आहेत. त्यांची प्रकृती बरी होऊन त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे.  आजारपणात देखील पर्रीकर यांना काम करावे लागत आहे. कारण त्यांच्यानंतर भाजपमध्ये दुसरी फळीच निर्माण झाली नसल्याचेही  राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले,  2019  या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची सध्या देशभरात विविध पक्षांकडून  तयारी सुरु आहे. शिवसेनेने  गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संमती दिली आहे. उद्धव ठाकरे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवा दौर्‍यावर येणार आहेत. ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तीन ते चार रॅलींमध्ये  सहभागी  होतील.  गोवा विधानसभा निवडणुकीत   शिवसेना पक्षाने गोवा सुरक्षा मंच व  मगोशी युती केली होती. त्यापैकी मगोने राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. गोवा सुरक्षा मंच सोबतची शिवसेनेची युती कायम आहे.  मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी  मागील आठवडयात मुंबई येथे उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

गोवा सुरक्षा मंचकडून विधानसभेची तयारी सुरु करण्यात आली असून  लोकसभा  निवडणूक  लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  त्यामुळे शिवसेना लोकसभा निवडणूक   स्वतंत्रपणे लढणार असून पक्षाकडे  उमेदवार आहेत.  शिवसेनेकडून राज्यात पक्ष विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसात   राज्यातील अन्य तालुक्यांमध्येही पक्षाची कार्यालये उघडली जाणार आहेत.  गोव्यात डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्यावर सध्या वाद सुरु आहे. शिवसेनेची भूमिका ही या विषयावर लोकभावने बरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले.

 या पत्रकार परिषदेला   शिवसेनेचे प्रवक्ते जितेश कामत, प्रवक्त्या  राखी प्रभूदेसाई नाईक, आदेश परब व  संपर्क प्रमुख  जीवन कामत उपस्थित होते.  

जितेश कामतही शिवसेना राज्यप्रमुखपदी

 शिवसेनेचे  प्रवक्ते जितेश कामत यांना   शिवसेनेच्या  राज्यप्रमुखपदी   बढती देण्यात आली आहे. कामत हे शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्या सोबत काम करतील. त्यामुळे गोवा शिवसेनेला आता दोन राज्यप्रमुख असतील असेही प्रभारी  संजय राऊत यांनी सांगितले.