Thu, Jul 02, 2020 14:22होमपेज › Goa › शिरवई प्राथमिक, सांगे उच्च माध्यमिकची अवस्था बिकट

शिरवई प्राथमिक, सांगे उच्च माध्यमिकची अवस्था बिकट

Published On: Jun 10 2019 1:31AM | Last Updated: Jun 10 2019 1:31AM

मडगाव : प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना लोकांच्या भाड्याच्या खोलीत आणि मंदिरात बसून शिकावे लागत असून शिरवई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची अवस्थाही बिकट झाली आहे. सांगे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या गुरुवारपासून विद्यार्थी नियमित हजेरी लावत आहेत. मात्र, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सर्व साहित्य वर्गात साठवण्यात आल्याने शिकवणी सुरू करणेही अशक्य होत आहे. 

सांगे उच्च माध्यमिक विद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि कृषी अशा चार शाखा आहेत. सांगे भागात हे एकमेव उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने वाडे, नेतूर्ली, नेत्रावळी, वालंकिणी, सांगे बाजार, कोटार्ली या परिसरातील विद्यार्थी या उच्च माध्यमिक विद्यालयात येतात. सरकारने इतर विद्यालयांप्रमाणे या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दुरुस्तीचे काम सात महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. दीड कोटी रुपये खर्च करून इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येणार होते. छताचे काम पूर्ण झाले असून आता टाइल्सचे काम शिल्लक आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी हे काम होणे गरजेचे होते. सहा जून रोजी राज्यातील शाळांना सुरुवात झाली. दहा तारीख उलटूनही दुरुस्ती काम पूर्ण न झाल्याने नियमित वर्गात शिकवणीला सुरुवात झालेली नाही. दूरवरून विद्यार्थी नेहमीप्रमाणे उच्च मध्यमिक विद्यालयात येत आहेत. मात्र, वर्गात बसायला जागाच नसल्याने व्हरांड्यातच थांबून अकरा वाजता घरी जात आहेत.

काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, कला आणि वाणिज्य शाखांच्या वर्गात मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे साहित्य आहे. त्यामुळे बारावीची शिकवणी अजून सुरू झालेली नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही वर्गात टाईल्स् घालण्याचे काम पूर्ण झाले असले तरी त्या वर्गांची साफसफाई पूर्ण झालेली नसल्याने तिथे बसता येत नाही. दूरवरुन येणारे विद्यार्थी स्वतः बाक पुसून वर्गात बसत आहेत. 

कामगारांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अजून टाईल्स् बसवण्याचे काम पूर्ण झाले नाही. काम पूर्ण होण्यासाठी अजून एक आठवडा जाणार आहे. वर्गातील बाक बाजूला काढून ठेवण्यात आले असून रंगकाम करण्यात आल्यामुळे वर्गात सर्वत्र रंगाचा वास पसरलेला आहे.

या विषयी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आनंद कुडाळकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सरकार जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे सुशोभीकरण करत आहे. टाईल्स् बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आणखी साहित्य येणे बाकी असल्याने थोडेच काम शिल्लक राहिलेले आहे. काही वर्गांच्या दुरुस्तीचे काम शिल्लक असून त्या वर्गांची शिकवणी घेण्यासाठी आणखी वर्ग आहेत.

शिक्षकांच्या संख्येविषयी त्यांना विचारले असता कुडाळकर यांनी सांगितले की, शिक्षक नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. एकूण 80 उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. त्यातील अठरा जणांची निवड केली जाणार आहे. त्याशिवाय गेल्या वेळी नियुक्त केलेल्या दोन शिक्षकांच्याबाबतीत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. ते शिक्षकसुद्धा बदलले जाणार आहेत, असेही कुडाळकर यांनी सांगितले.

25 कृषी शाखा, 35 वाणिज्य, शंभर कला, विज्ञान शाखेसाठी 35 नवीन प्रवेश झालेले आहेत. नवीन प्रवेश स्वीकारण्यासाठी आणखी आठ दिवसांची मुदत वाढवण्यात आलेली आहे. कृषी शाखा वगळता अन्य इतर शाखांमध्ये आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो, अशी माहिती कुडाळकर यांनी दिली.

‘पुढारी’च्या वृत्ताची दखल...

‘पुढारी’ मधून कामराळ येथील सरकारी प्राथमिक शाळांची अद्याप दुरुस्ती सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्याची गंभीर दखल घेत केपेचे भाग शिक्षण अधिकारी संजय नाईक-देसाई यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. सोमवार दि.10 रोजी शिक्षण खात्याच्या वरिष्ठांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली जाईल, असे संजय नाईक-देसाई यांनी सांगितले.