Tue, May 26, 2020 05:37होमपेज › Goa › शिरोडा, मांद्रेसह म्हापशाची पोटनिवडणूक शक्य

शिरोडा, मांद्रेसह म्हापशाची पोटनिवडणूक शक्य

Published On: Feb 20 2019 1:35AM | Last Updated: Feb 20 2019 12:16AM
पणजी : प्रतिनिधी

म्हापसा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असल्याची माहिती  सचिवालयाकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आली आहे. यामुळे शिरोडा व मांद्रे मतदारसंघासह म्हापशाची पोटनिवडणूक एकत्र होण्याची शक्यता वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसचे शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी 16 ऑक्टोबर-2018 रोजी भाजपात प्रवेश केला. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्याच दुपारी आमदारकीचा राजीनामा दिला. निवडणूक कायद्यानुसार, सहा महिन्यांत म्हणजे, 16 एप्रिल- 2019 च्या आत शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक होऊन नव्या दोन्ही आमदारांचा शपथविधी होणेे आवश्यक आहे.

दरम्यान, म्हापसाचे भाजप आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस  डिसोझा यांचे  14 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. यामुळे म्हापसा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असल्याचे विधानसभा कार्यालयाने निवडणूक आयोगाला लेखी कळविले आहे. आयोगाकडून लवकरच पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची अपेक्षा असून आधीच्या दोन मतदारसंघांसह म्हापशातही पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.