Mon, May 25, 2020 11:18होमपेज › Goa › भागधारकांचा पैसा सुरक्षित : खलप

भागधारकांचा पैसा सुरक्षित : खलप

Published On: Sep 29 2019 1:20AM | Last Updated: Sep 29 2019 1:20AM
म्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शनिवारच्या आमसभेत भागधारकांचा हैदोस पाहून सभा सोडून चेंबरमध्ये आलेल्या रमाकांत खलप यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, म्हापसा अर्बन बँक तशी सुस्थितीत आहे. राजकीय निर्णयांचे ग्रहण, एन.पी.ए.चा प्रश्न, रिझर्व्ह बँकेचे अकारण आलेले निर्बंध यामुळे बँकेचे व्यवस्थापन मेटाकुटीस आले असले तरी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे भागधारक, ठेवीदार व खातेदारांनी घाबरायचे कारण नाही. 

भिऊ नका तुमचा पैसा सुरक्षित आहे, असे सांगून खलप म्हणाले की, म्हापसा अर्बनकडे भागधारकांना 350 कोटी रुपये देण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. सरकारचे असेच सहकार्य लाभल्यास टी.जे.एस. बी. किंवा डी.एन.एस वा अन्य कोणत्याही आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकेत म्हापसा अर्बनचे विलीनीकरण केले जाईल, असे खलप म्हणाले.

म्हापशातील काही विघ्नसंतोषी आणि असंतुष्ट लोकांनी गेल्या तीन-चार आमसभांत अकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आमचे स्वतःचे पैसेही बँकेत आहेत ते आम्ही काढले नाहीत. ज्यांनी घाबरून आपले पैसे काढले आहेत त्यांनीच आता आमसभेत गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. ते खलप परिवाराला संपवायचा प्रयत्न करत आहेत. बँकेचे दीड लाख भागधारक असून त्यातील बहुतेक भागधारकांचा आपल्यावर विश्वास आहे, असे खलप म्हणाले. 

म्हापसा अर्बन वाचविण्यासाठी बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण करणे, गोव्यातील सर्व सहकारी बँकांचे एकत्रीकरण आणि केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना जशी आर्थिक मदत दिली तशी आर्थिक मदत देणे असे तीन पर्याय आहेत. गोव्यातील गोवा अर्बन सहकारी बँक, मडगाव अर्बन बँक, गोवा स्टेट को-ऑप बँक, म्हापसा अर्बन बँक या आर्थिक संकटात आहेत. गोव्यातील बंद झालेला खाण उद्योग व एन.पी.ए यामुळेच ही स्थिती उद्भवली. यावर तोडगा काढण्याचे काम त्यावेळच्या सरकारांनी करायला हवे होते. आजचे सरकार समजदार आहे. मुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे, असेही ते म्हणाले.

भागधारकांची खलपांवर टीका 

म्हापसा अर्बन बँकेच्या काही भागधारकांनी आमसभेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अ‍ॅड. खलप फॅमिलीचे हे नियोजित नाटक आहे. आजचा संघर्ष व्हावा, असे त्यांना मनातून वाटत असावे. अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांना त्यांनी पढवून सभेला उभे केले. त्यानुसार ते वागले. या पत्रकार परिषदेत राजसिंह राणे, बाबा गवंडळकर, कमलाकांत भर्तु, किरण शिरोडकर, प्रभाकर साळगावकर, संदेश नाईक उपस्थित होते.