Wed, Jul 08, 2020 12:30होमपेज › Goa › शेल्डे मारहाणप्रकरणी सात संशयितांना अटक; सुटका

शेल्डे मारहाणप्रकरणी सात संशयितांना अटक; सुटका

Published On: Mar 05 2019 1:46AM | Last Updated: Mar 05 2019 12:01AM
मडगाव : प्रतिनिधी

शेल्डे येथे एका कुटुंबातील काही सदस्यांना तसेच पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी सोमवारी सकाळी सात जणांना अटक करून सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका केली. एक संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकरणात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व संशयितांना कुडचडे पोलिस स्थानकाच्या कोठडीत न ठेवता  मडगाव पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.  

कुडचडे येथील सुमारे पंधरा जणांच्या गटाने रविवारी शेल्डे येथे येऊन शशी गावस देसाई यांना मारहाण केली होती, तसेच त्यांच्या पत्नी व मुलीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या निकेत गावस देसाई या पोलिसालाही बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यामुळे शेल्डे विरुद्ध कुडचडे असे दोन गट तयार होऊन दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली होती. कुडचडे येथील युवक शेल्डे येथे येऊन मारामारी करत आहेत, अशी लोकांची भावना झाल्याने सर्व जणांना अटक करावी, अशी मागणी करून शेल्डे येथील सुमारे पाचशे जणांनी रविवारी तिळामळ जंक्शनवर सहा तास रास्ता रोको केला होता.केपे पोलिसांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अखिलेश गावस देसाई यांच्या तक्रारीस अनुसरून सोमेश बाबू तिरोडकर, संजित संजय नाईक, आदेश आशिष सय्यद, विराज विलास नाईक, राहुल मोहन नाईक, रवी बसप्पा हडगळ, वतन विठ्ठल नाईक या सात जणांना अटक केली.गीतेश नाईक हा संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
केपे पोलिस स्थानकाची इमारत मोडकळीस आलेली असल्याने या पोलिस स्थानकाशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांना कुडचडे पोलिस स्थानकाच्या कोठडीत ठेवले जाते. पण वरील प्रकरणात सर्व संशयित कुडचडे येथील रहिवाशी असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी म्हणून   सर्व संशयितांना मडगाव पोलिस स्थानकाच्या कोठडीत ठेवण्यात आले. सर्व संशयितांनी सोमवारी  जामिनासाठी अर्ज केला होता. तो सायंकाळी मंजूर झाल्यानंतर सर्वांना मुक्त करण्यात आले.

पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी रविवारी रात्री उशिरा केपे येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गीतेश नाईक याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, शेल्डेचे सरपंच प्रमोद देसाई यांनी अमली पदार्थ प्रकरणांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी मागणी केली आहे. शेल्डे येथे कालव्याजवळ मोठ्या प्रमाणात पार्ट्या झडत असून दारूबरोबरच युवक अमली पदार्थ सेवन करत असल्याने त्याठिकाणी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.