Wed, May 27, 2020 05:14होमपेज › Goa › गोवा : नव्या सभापतींची निवड ४ जूनला

गोवा : नव्या सभापतींची निवड ४ जूनला

Published On: May 29 2019 2:09AM | Last Updated: May 29 2019 8:02AM
पणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन येत्या 4 जून रोजी घेतले जाणार असून त्यात विधानसभेच्या नव्या सभापतीची निवड केली जाणार आहे. सभापतीचे पद विधानसभेतील एखाद्या ज्येष्ठ सदस्यालाच मिळावे, असे आपले मत असल्याचे हंगामी सभापती मायकल लोबो यांनी सांगितले.

पर्वरी येथील विधानसभा संकुलात नवनिर्वाचित चार आमदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हंगामी सभापती मायकल लोबो दाखल झाले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. लोबो म्हणाले की, विधानसभेच्या हंगामी सभापती पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे आपण आधीच जाहीर केले होते. आपण उपसभापती म्हणून सध्यातरी काम पाहत आहे. मात्र, नवा सभापती कोण असावा, हे भाजप पक्षाने आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निश्‍चित करण्याची गरज आहे. 

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या अपात्रता याचिकेची फाईल कायदेशीर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली असून ती पुन्हा सभापती कार्यालयात दाखल झाली आहे. त्यावरील सल्ल्याची आपण अजून पडताळणी केलेली नाही. राणे यांच्यासंबंधी याचिकेची सुनावणी आपल्याला वेळ मिळाला तर घेऊ शकतो, अथवा कदाचित नवा सभापतीही त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. 
मगोच्या माजी दोन आमदारांविरूद्धही अपात्रता याचिका सभापतींसमोर आली असून याच प्रकरणी उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. या दोन्ही आमदारांना सभापती कार्यालयातून याचिकेसंबंधी नोटीस पाठवली जाणार आहे. त्यांच्याकडून लेखी उत्तराची वाट पाहिली जाणार असून हे प्रकरण नवीन सभापतीनेच हाताळणे अधिक सोयीचे ठरेल, असे लोबो म्हणाले. 

शिरोडकर बनणार नवे सभापती?

शिरोडा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेले सुभाष शिरोडकर हे नवे सभापती बनण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयी शिरोडकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, आपण सातव्यांदा विधानसभेचे सदस्य बनलो असून मतदारसंघाचा विकास करणे, हे आपले ध्येय आहे. आपण कुठल्याही पदाची अथवा मंत्रिपदाची मागणी अथवा आशा ठेवलेली नाही. मंत्रिपदे येतात व जातात, मात्र आमदार म्हणून कामगिरी चांगली करणे आपल्या हातात आहे. आपल्यावर पडेल, ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहे.