Wed, May 27, 2020 05:14होमपेज › Goa › छाननीत 14 जणांचे अर्ज फेटाळले

छाननीत 14 जणांचे अर्ज फेटाळले

Published On: Apr 06 2019 1:45AM | Last Updated: Apr 06 2019 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांच्या शुक्रवारी झालेल्या  छाननीनंतर लोकसभेच्या दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा मतदारसंघात प्रत्येकी सहा मिळून एकूण 12 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. तर  विधानसभेच्या पोटनिवडणुकीत म्हापशात-7, मांद्रेत-5 आणि शिरोड्यात-6   असे 18 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. छाननीत म्हापसा आणि शिरोडातील उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले असले तरी ते फेटाळण्यात आले.लोकसभेसाठी 4 उमेदवारांचे तसेच विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तीन मतदारसंघांतून 10 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती निवडणूक उपायुक्त नारायण सावंत यांनी दिली.

लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गिरीश चोडणकर (काँग्रेस), प्रदीप पाडगावकर (आम आदमी पक्ष), अमित आत्माराम कोरगावकर (आरपीआय), ऐश्‍वर्या साळगावकर (अपक्ष )  आणि भगवंत सदानंद कामत (अपक्ष) या सहा उमेदवारांचे अर्ज वैध  ठरले असून प्रसाद आमोणकर व दयानंद मांद्रेकर या दोघांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. 
दक्षिण गोव्यात छाननीनंतर अ‍ॅड. नरेंद्र सावईकर (भाजप), फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस), एल्विस गोम्स (आम आदमी पक्ष), राखी नाईक प्रभूदेसाई (शिवसेना), डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष) व मयूर काणकोणकर (अपक्ष) या सहा उमेदवारांचे अर्ज वैध  ठरले असून, निलेश काब्राल, येमेन डिसोझा या दोघांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. 

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिरोड्यातून सुभाष शिरोडकर (भाजप), दीपक ढवळीकर (मगो), महादेव नाईक (काँग्रेस), योगेश खांडेपारकर (आम आदमी पक्ष), संतोष सतरकर (गोवा सुरक्षा मंच) आणि हरीश्‍चंद्र नाईक (फॉरवर्ड डेमॉक्रेटीक लेबर पार्टी) या सहा   उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. दहा उमेदवारांपैकी गौरी शिरोडकर, हर्षद देवारी, अभय प्रभू, निलेश गावकर या चौघांचे अर्ज फेटाळण्यात आले.

मांद्रेतून दयानंद सोपटे ( भाजप), बाबी बागकर (काँग्रेस), स्वरुप नाईक (गोवा सुरक्षा मंच), जीत आरोलकर (अपक्ष) आणि मुक्‍ती आरोलकर (अपक्ष) हे मिळून  पाच  उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सात उमेदवारांपैकी दीपश्री सोपटे, जान्हवी नाईक या दोघांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. 

म्हापसातून  जोशुवा डिसोझा (भाजप), सुधीर कांदोळकर (काँग्रेस), संजय बर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस), नंदन उर्फ नरसिंह सावंत (गोवा सुरक्षा मंच), शेखर नाईक (आम आदमी पक्ष), आशिष शिरोडकर (अपक्ष) आणि सुदेश हसोटीकर (अपक्ष) हे सात उमेदवार आहेत. एकूण 11 उमेदवारांपैकी राजसिंग राणे, रोशन सामंत, प्रदीप आमोणकर, विजय भिके या चौघांचे अर्ज फेटाळण्यात आले.
सोमवार दि. 8 एप्रिल रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या  स्पष्ट होणार आहे.

म्हापशात हरकतीचा मुद्दा फसला; सातही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य  

विधानसभेच्या म्हापसा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी कबीर शिरगावकर यांनी सात उमेदवारी अर्ज ग्राह्य धरले आहेत. या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. छाननीनंतर डमी अर्ज गाळण्यात आले.

छाननीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय बर्डे यांनी भारतीय काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्या विरोधात हरकतीचा मुद्दा उपस्थित करून त्यांचा अर्ज स्वीकारू नये, अशी मागणी केली.कांदोळकरानी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात काहीतरी माहिती लपवल्याचा त्यांचा दावा होता. 

निवडणूक अधिकार्‍यांनी संजय बर्डे यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करण्यास सांगितले. संजय बर्डे अधिकार्‍यांची परवानगी न घेता तेथून निसटले, दुपारी 1 वा. पर्यंत निवडणूक अधिकार्‍यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करणारे उमेदवार संजय बर्डे यांची वाट पाहिली. नंतर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, फोनवरही त्यांच्याशी संपर्क झाला नाही.   शेवटी लेखी पत्र घरी पाठवले, तरीही ते उपस्थित राहिले नसल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी हरकतीच्या मुद्यात तथ्य नसल्याने कांदोळकरांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला.