Tue, May 26, 2020 05:28होमपेज › Goa › ‘मगो’ज्येष्ठ नेत्याकडे सरकारचे नेतृत्त्व द्या

‘मगो’ज्येष्ठ नेत्याकडे सरकारचे नेतृत्त्व द्या

Published On: Nov 18 2018 1:25AM | Last Updated: Nov 17 2018 11:18PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मागील आठ महिन्यांपासून आजारी असल्याने राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळे नेतृत्वाची धुरा ज्येष्ठ मंत्री अर्थात मगोच्या ज्येष्ठ नेत्याकडे ताबडतोब सोपवण्यात यावी, असा ठराव मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेतल्याचे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. अन्यथा लोकसभा निवडणूक लढवण्याबरोबरच  शिरोडा व मांद्रे येथील पोटनिवडणुका लढवण्याचाही विचार मगो पक्ष करीत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

सांतिनेझ पणजी येथील मगोच्या कार्यालयात शनिवारी (दि.17) सदर बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील एकूण राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समितीचे नेते उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले की, राज्यातील खाण अवलंबितांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी दिल्‍ली येथील जंतरमंतरवर आयोजित धरणे आंदोलनात  मगो पक्ष  सहभागी होणार आहे. खाण अवलंबितांना मगो पक्षाने पाठिंबा देण्याचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असल्याने प्रशासनावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे  नेतृत्त्व बदलाची गरज असून नेतृत्व  ज्येष्ठ मंत्र्याकडे अर्थात मगोच्या ज्येष्ठ नेत्याकडे  सोपवावे, अशी मागणी ठरावाव्दारे करण्यात आली.  यासंबंधी कुठलाही निर्णय झाला नाही तर पोटनिवडणुका जाहीर होताच मगो पक्ष पुन्हा बैठक घेऊन यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले. प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासन सुरळीत चालण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे. त्यामुळे सरकारने नेतृत्व बदलाचा विषय मिटवणे आवश्यक आहे. अन्यथा मगो पक्ष सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय घेईल. प्रशासन  ठप्प झाले आहे यावर वेळोवेळी आपण आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले.

मांद्रेत जीत आरोलकर यांना मगो पक्ष आपला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेईल. पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट  करणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मगो पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली आहे. शिरोडा पोटनिवडणूक लढवण्याची आपली इच्छा आहे. मात्र पक्षाने त्यावर निर्णय घ्यावा. पक्ष सांगेल तेथे आपण निवडणूक लढवणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

मुदत उलटल्यानंतर मगोची कृती नाही
नेतृत्व बदलाची मागणी करुन मुख्यमंत्रीपदाची धुरा ज्येष्ठ मंत्र्यांकडे अर्थात सुदिन ढवळीकरांकडे  देण्याची मगोची मागणी नवी नाही. यापूर्वीदेखील दीपक ढवळीकर यांनी ही मागणी करुन त्या निर्णयासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. परंतु मुदत उलटल्यानंतरदेखील कुठलीही ठोस कृती केली नाही.