Fri, Jun 05, 2020 02:31होमपेज › Goa › संजीवनीचे केमिस्ट, अकाऊंटंट निलंबित

संजीवनीचे केमिस्ट, अकाऊंटंट निलंबित

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 18 2019 1:43AM
धारबांदोडा : प्रतिनिधी

संजीवनी साखर कारखान्याचे चिफ केमिस्ट नवीनकुमार वर्मा आणि चिफ अकाऊंटंट साक्षी शेटगावकर या दोन अधिकार्‍यांना गेल्या वर्षाच्या साखर विक्री निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याच्या संशयावरून गुरुवारी संध्याकाळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी दामोदर मोरजकर यांनी निलंबित केले. 

साखर विक्री निविदेत घोळ झाल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर व याविषयी कंत्राटदाराचे फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग कामगारांपर्यंत पोहोचल्यानंतर, कामगारांनी यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी गुरुवारी लावून धरली. कारवाई होत नाही तोपर्यंत काम सुरू न करण्याचा निर्णय घेतला. कामगारांच्या मागणीनुसार संध्याकाळी उशिरा चिफ केमिस्ट नवीनकुमार वर्मा व चिफ अकाऊंटंट साक्षी शेटगावकर यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, निलंबनाचा आदेश काढला की नाही याची खात्री शेवटी कामगारांनी फोंडा पोलिस अधिकार्‍यांकडून करून घेतली.

चिफ अकाऊंटंट साक्षी शेटगावकर यांच्यावरही गैरव्यवहारप्रकरणी आरोप असून त्यांनीही आरोप फेटाळून लावला आहे. या संदर्भात कारखान्यातील कामगार म्हणाले की, कारखान्यात केमिस्ट म्हणून काम करणार्‍या अधिकार्‍याला महिन्याला दीड लाख रुपये ओव्हरटाईमच्या नावाखाली देण्यात येत आहेत; पण कामगारांना पिण्याचे पाणी देण्यासाठी मात्र कारखान्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. गेल्यावर्षी साखर गोदामाच्या दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते; पण काम पूर्ण न करताच ठेकेदाराने पलायन केले. त्यामुळे पावसाचे पाणी गोदामात आले आणि साखर खराब झाल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले. 

यंदाही पावसाळा जवळ आला तरी गोदामाच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर तसेच ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी कारखाना प्रशासकांची भेट घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून कारखाना तोट्यात चालत आहे. त्यात ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने आंदोलने करावी लागत आहेत. कारखाना वाचविण्याचा प्रयत्नही सरकारकडून होत आहे. मात्र साखर कमी दरात विकून कमिशन मिळविण्याच्या प्रकारावर लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

कोणत्याही चौकशीला तयार ः नवीनकुमार वर्मा 

कमिशन घेतल्याचा आरोप चिफ केमिस्ट नवीनकुमार वर्मा यांनी फेटाळून लावला असून आपल्याविरुद्ध हे षड्यंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण कायद्याला धरूनच साखर विक्री प्रक्रिया केलेली आहे, असे सांगून कोणत्याही चौकशीला आपण तयार असल्याचेही म्हटले आहे.