Wed, Jul 08, 2020 14:09होमपेज › Goa › टुरिस्ट टॅक्सीचालक अचानक संपावर

टुरिस्ट टॅक्सीचालक अचानक संपावर

Published On: Aug 03 2019 1:03AM | Last Updated: Aug 03 2019 1:03AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा माईल्स अ‍ॅप बंद करण्यास सरकारने नकार दिल्यानंतर गोवा टुरिस्ट टॅक्सीचालकांनी काल शुक्रवारी अचानक टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवून संप पुकारला. दरम्यान, सरकार गोवा माईल्स टॅक्सी अ‍ॅप बंद करेपर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत, या स्थितीला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असे निवेदन अखिल गोवा टुरिस्ट टॅक्सी मालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्याच्या किनारी भागातील टुरिस्ट टॅक्सी चालकांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. या संपात दाबोळी विमानतळावरील 350 काळ्या-पिवळ्या टॅक्सीदेखील सहभागी झाल्या होत्या. टुरिस्ट टॅक्सी मालकांनी अचानकपणे पुकारलेल्या या संपामुळे रेल्वे स्थानक, दाबोळी विमानतळ, बसस्थानकांवर येणार्‍या पर्यटकांचे काही प्रमाणात हाल झाले. कदंब महामंडळाकडून अतिरीक्‍त बसेसची सोय करण्यात आली होती. परंतु तरीदेखील प्रवाशांचे हाल झाले. टुरिस्ट टॅक्सी चालकांनी संप पुकारला असला तरी हॉटेल्स तसेच कॅसिनोंच्या टुरिस्ट टॅक्सी कार्यरत होत्या. या संपाचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम जाणवला नाही. 

टुरिस्ट टॅक्सीचालकांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटक तसेच सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी कदंब महामंडळाकडून वेगवेगळ्या मार्गांवर अतिरीक्‍त कदंब बसेस सोडण्यात आल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खासगी टॅक्सी चालकांनी संप पुकारलेला असताना गोवा माईल्स अंतर्गत टॅक्सी सेवा मात्र सुरू होती. खासगी टॅक्सी चालकांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा टॅक्सी माईल्स कुठल्याही स्थितीत बंद करणार नाही, असे सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

गोवा माईल्स टॅक्सी अ‍ॅपमुळे टुरिस्ट  टॅक्सी मालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. टुरिस्ट टॅक्सी हा गोमंतकीयांचा पारंपरिक व्यवसाय असून गोवा माईल्समुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप रद्द करावे अशी टुरिस्ट टॅक्सी मालकांची मागणी आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका होऊन त्यावर चर्चाही झालेली आहे. मात्र विधानसभेत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात गोवा माईल्सच्या विषयावर विशेष चर्चा झाली आहे.

गोवा माईल्स हे उत्कृष्ट अ‍ॅप असून टुरिस्ट चालकांनीदेखील त्यात सहभागी व्हावे असे आवाहन करून हे अ‍ॅप रद्द करण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. सरकारने मागणी फेटाळल्यानंतर टुरिस्ट चालकांनी शुक्रवारी अचानक संप पुकारला. 

उत्तर गोवा टुरिस्ट टॅक्सी मालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर यासंदर्भात म्हणाले, गोव्यात 26 हजार नहेंदणीकृत टुरिस्ट टॅक्सी असून त्यापैकी 8 हजार टॅक्सी या किनारी भागात आहेत. कळंगुट, कांदोळी, मोरजी, हरमल आदी किनारी भागात हा संप कडकडीत पाळण्यात आला. मात्र शहरी भागात त्याचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले.

विमान प्रवाशांच्या दिमतीला ‘कदंब’ सेवा 

दाबोळी विमानतळावर सकाळी व दुपारी विमानांची रहदारी सुरू झाल्याने विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची ने-आण करण्यासाठी खास कदंब बसचा ताफा ठेवण्यात आला होता. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कदंब बसेसच्या एकूण 17 फेर्‍या मारल्या. विमानाने आलेल्यांपैकी 90 टक्के पर्यटक कळंगुटला रवाना झाले. या कदंबच्या 17 फेर्‍यांत 800 प्रवाशांना दाबोळी विमानतळावरून ने-आण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री 10 वाजेपर्यंत सदर बसेसच्या फेर्‍या सुरू होत्या. या व्यतिरीक्‍त गोवा माईल्सनेही प्रवाशांना ने-आण करण्याचे काम सुरळीत केले. तसेच खासगी पर्यटक बसेसही सुरळीतरीत्या सुरू होत्या. काही पर्यटकांनी रिक्षाद्वारे दाबोळी विमानतळ गाठला. विमानतळावर दिवसभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत, दाबोळी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रवी देसाई, वाहतूक पोलिस निरीक्षक मेल्विन कुलासो यांनी दाबोळी विमानतळावर कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली.