Wed, May 27, 2020 10:33होमपेज › Goa › रेव्हल्यूशनरी गोवन्स कार्यकर्त्यांना जामीन

रेव्हल्यूशनरी गोवन्स कार्यकर्त्यांना जामीन

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
पेडणे ः पुढारी वृत्तसेवा

रेव्हल्यूशनरी   गोवन्स या संघटनेच्या सर्वेश कारापुरकर व रितेश कानोलकर यांची जामिनावर पेडणे न्यायालयाने बुधवारी सकाळी सुटका केली. या दोन्ही कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी  मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जमून पेडण्यात शक्ती प्रदर्शन केले.  राज्याच्या विविध भागातील आलेल्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.  पोलिसांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवावा,अन्यथा हे आंदोलन संपूर्ण  राज्यभर पेटवू,असा इशारा रेव्हल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी  दिला.

अ‍ॅड. जितेंद्र गावकर यांच्या प्रयत्नाने    सर्वेश कारापुरकर व रितेश कानोलकर यांना जामीन मंजूर झाला.पेडणे पोलिस स्थानकातून सायंकाळी 4 वाजता दोघांनाही बाहेर सोडण्यात  आले.  23 मार्चपर्यंत पेडणे पोलिस स्थानकात सकाळी हजेरी लावण्याची अट न्यायालयाने  जामीन मंजूर करताना घातली आहे. 

सविस्तर माहितीनुसार 17 मार्च रोजी धारगळ पंचायत सभागृहाबाहेर उपमुख्यमंत्री आपल्या समर्थकांसह सभा संपवून  दुसर्‍या नियोजित कार्यक्रमासाठी जात होते,त्यावेळी रेव्हल्यूशनरी गोवन्सचे कार्यकर्ते 
रितेश कानोलकर व व सर्वेश कारापूरकर यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना तुम्ही कुणाला नोकर्‍या दिल्या असा जाब  विचारला ,त्यावेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली, मंत्री आजगावकर समर्थकांनी स्थानिक दोन्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात पेडणे पोलिसाना तक्रार दिली , पोलिसांनी दोन्ही संशयिताना अटक केली ,18 मार्च रोजी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका केली. 17 मार्च रोजी दोघानाही अटक करून तुरुंगात घातल्यामुळे त्याना पाठींबा देण्यासाठी 200 कार्यकर्ते हजर झाले त्यांनी रात्र गार्डनमध्ये काढली , 18 मार्च रोजी सकाळपासून कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.  

मनोज परब यांनी सांगितले,की  मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊ नये,असा आदेश दिला आहे, तर मग भारतीय जनता पक्षाचे नेते  जिल्हा पंचायतीच्या  निवडणूक प्रचारसभा कशा घेत आहेत, असा सवाल आमच्या   धारगळच्या   कार्यकर्त्यांंनी उपस्थिती केला.  त्यावर उपमुख्यमंत्री  आजगावकर यांनी  हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री सावंत यांनाच विचारा,असे सांगून   आमच्या कार्यकर्त्यांना  शिवीगाळ केली.  तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली , हातातला मोबाईल बाबू आजगावकर यांनी काढून घेतला. रितेश कानोलकर यांचे वडील हे बाबू आजगावकर यांचे कार्यकर्ते असून आजगावकर यांनी त्यांच्या 
मुलालाच तुरुंगात  डांबले. आजगावकर हे आपल्या इतर कार्यकर्त्यांनाही   तुरुंगात घालायला विलंब लावणार नाहीत. तेव्हा त्यांच्यापासून सावध रहा,असा इशारा  मनोज परब यांनी दिला.