Thu, May 28, 2020 20:29होमपेज › Goa › प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कलाकारांचा सन्मान करावा

प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कलाकारांचा सन्मान करावा

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:36AMफोंडा : प्रतिनिधी

कला क्षेत्रात चमकण्यासाठी जिद्द व आव्हान स्वीकारण्याची तयारी कलाकाराकडे असावी लागते.    त्यातूनच भविष्यातील यशस्वी कलाकार घडतो.   समाजात अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नाहीत, त्या कलाकारांचा प्राधान्याने सन्मान करावा, असे आवाहन सिने अभिनेते तथा नाट्यकलाकार अशोक सराफ यांनी  केले.

राजीव गांधी कला मंदिरात आयोजित केलेल्या नाट्यकर्मी अजित केरकर यांच्या सत्कार सोहळ्यात  अशोक सराफ बोलत होते. सिने अभिनेत्री निवेदिता सराफ, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत, चित्रा फडते, रामचंद्र नाईक, व सत्कारमूर्ती अजित केरकर उपस्थित होते. अशोक सराफ म्हणाले, कलाकारांची खाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यातील प्रत्येक घरात कलाकार तयार होत आहे.  यामुळे  गोव्यात संस्कृती संवर्धनासोबत नवीन कलाकारांची निर्मिती  होत आहे. ढवळीकर म्हणाले, अजित केरकर हे बांदोडा गावचे भूषण आहे.  सामाजिक भान ठेवून व गोव्यातील रंगभूमीला चांगले दिवस येण्यासाठी नाट्यकर्मींचा सत्कार होणे गरजेचे आहे.  अजित केरकर यांनी गेल्या 50 वर्षात अनेक ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक भूमिकांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशा कलाकाराचा आदर्श नवीन कलाकारांनी घेण्याची गरज आहे.

अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत   मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते  अजित केरकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व  मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गिरीश वेळगेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. किरण नाईक यांनी स्वागत केले. गोविंद भगत व सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.  मेघश्याम पालयेकर यांनी  आभार मानले.