Fri, May 29, 2020 21:16होमपेज › Goa › काँग्रेसकडून लोकशाहीची विटंबना

काँग्रेसकडून लोकशाहीची विटंबना

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 12:30AMपणजी : प्रतिनिधी  

विरोधी पक्ष काँग्रेसकडून संसदेत चर्चेऐवजी केवळ गोंधळ घातला जात आहे. महत्त्वाच्या प्रश्‍नांना बगल दिली जात असून याप्रकारे विरोधकांनी लोकशाहीची विटंबना चालवली आहे, अशी टीका केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी  भाजपकडून पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या उपोषणावेळी  केली.
संसदेच्या कामकाजात अडचणी  निर्माण करून संसदेचा वेळ वाया घालवल्याच्या विरोधात विरोधी पक्ष काँग्रेसचा निषेध करण्यासाठी  भाजपच्या देशव्यापी आंदोलनांतर्गत   गोव्यातील भाजपचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर व राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी  लाक्षणिक उपोषण केले.

मंत्री नाईक म्हणाले,  काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांनी लोकसभा तसेच राज्यसभेत गोंधळ घालून संसदेच्या 23 दिवसीय अधिवेशनाचा वेळ वाया घालवला. संसदेचे काम बंद पाडण्यास काँग्रेसने अन्य पक्षांना चिथावले. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची विटंबना आहे.  भाजप खासदारांनी 23 दिवसांचे वेतन व भत्ता परत केला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर म्हणाले, काँग्रेस  हा सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरत आहे. त्यांचा सर्व राज्यांमध्ये पराभव होत असल्याने भाजपचा विजयरथ अडवण्याठी त्यांच्याकडून संसदेत गोंधळ घालण्यासारखी कृत्ये केली जात आहेत.या आंदोलनात मंत्री पांडुरंग मडकईकर, फ्रान्सिस डिसोझा, विश्‍वजीत राणे, एलिना साल्ढाणा, आमदार निलेश काब्राल, ग्लेन टिकलो, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेश पाटणेकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, महादेव नाईक, सिद्धार्थ कुंकळ्येकर, व अन्य नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 Tags : Repression, democracy ,Congress ,goa news