Mon, Sep 16, 2019 12:30होमपेज › Goa › इफ्फ़ीत सर्व देशांतील प्रतिनिधींचे सादरीकरण व्हावे : किरण शांताराम

इफ्फ़ीत सर्व देशांतील प्रतिनिधींचे सादरीकरण व्हावे : किरण शांताराम

Published On: Nov 23 2018 1:19AM | Last Updated: Nov 23 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दरवर्षी नवनवीन बदल होत असून महोत्सवाव्दारे जागतिक पातळीवर चित्रपट क्षेत्रात बदल घडविण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून कित्येक देश व त्यांची संस्कृती एकत्र येत आहे. यात भर घालण्यासाठी येत्या काळात इफ्फीच्या भव्य उद्घाटनाला सर्व देशांतील प्रतिनिधींचे एखादे सादरीकरण व्हावे, असे मत एफएसएसआयचे अध्यक्ष किरण शांताराम  यांनी व्यक्त केले. 

इफ्फी, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया व गोवा मनोरंजन संस्थेच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित ओपन फोरमचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर डीएफएफचे पदाधिकारी चैतन्य प्रसाद,  फ्रांन्सची अभिनेत्री मेरीएन बोर्गो, सेंथिल राजन, नागथिहल्ली चंद्रशेखर, राहुल रवेल व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

ओपन फोरम विभागाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  ‘चित्रपट संस्कृती पुढे नेण्यासाठी चित्रपट महोत्सवांची भूमिका’ या विषयावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 
किरण शांताराम म्हणाले, हा महोत्सव संस्कृती व लोकांना एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. इफ्फी हा सिनेप्रेमींचा महोत्सव आहे. त्यामुळे महोत्सवात नवीन संकल्पनांना जागा आहे. महोत्सव दरवर्षी उत्तमप्रकारे सादर होणार यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले. 

राहुल रवेल म्हणाले, की जगात 1 हजार 200 चित्रपट महोत्सव होत  असतात. या महोत्सवांचा चित्रपट संस्कृतीसाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार करून महोत्सवाचा दर्जा वाढविला पाहिजे. महोत्सवात येणार्‍या प्रतिनिधींना आपण महोत्सवातून काय देत आहोत हे महत्वाचे असते. त्यामुळे चित्रपट निवडण्याच्या प्रक्रियेवर फार मोठी जबाबदारी असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.  
मेरीएन बोर्गो म्हणाल्या, की गेली 7 वर्षे आपण इफ्फीत सहभागी होत आहे. दरवर्षी येथे नवीन पहायला मिळते. चित्रपटांच्या माध्यमातून नवीन विषय व मुद्यांवर चर्चा होते. महोत्सव संस्कृतींनाच नाही तर लोकांना एकत्र बांधत आहे. त्यात येत्या वर्षात अधिक सुधारणा नक्कीच होतील.