Tue, Sep 17, 2019 04:18होमपेज › Goa › धार्मिक कार्यक्रमांना अडसर नको

धार्मिक कार्यक्रमांना अडसर नको

Published On: Apr 12 2019 2:03AM | Last Updated: Apr 12 2019 12:01AM
पणजी : प्रतिनिधी
निवडणूक आचारसंहिता काळात राज्यात  रात्री 10 नंतरही चालणार्‍या परंपरागत धार्मिक कार्यक्रमांना आचारसंहितेच्या सबबीखाली अडथळा आणू नये, अशी मागणी राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी दिली. आल्तिनो येथील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत निवडणूक आयुक्त कुणाल (आयएएस), उपायुक्त नारायण सावंत व अन्य अधिकार्‍यांनी गुरूवारी बैठक घेतली. 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्यातील विविध धार्मिक कार्यक्रमांना रात्री 10 नंतरच्या वेळेत   मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास वा ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई केली जाते. राज्यात लवकरच रामनवमी, हनुमान जयंती तसेच गुड फ्रायडे, ईस्टर आदी धार्मिक उत्सव साजरे होणार आहेत, असे परंपरागत धार्मिक  सोहळे रात्री 10 नंतर  करू नयेत, अशा सूचना निवडणूक आयोगाचे भरारी पथक आयोजकांना  देत आहे. ईस्टर हा सणच मध्यरात्रीनंतर सुरू होतो. मध्यरात्री 1 वाजता प्रार्थना संपल्यानंतर नृत्य व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ध्वनिप्रदूषण विरोधी कायद्यात ध्वनिक्षेपक वापराला वर्षभरातील  15 दिवसांचा अपवाद करण्यात आला असून त्यात ‘ईस्टर’ सणाचा समावेश आहे. गोव्यातील काही सणांबाबत निवडणूक आयोगाने संवेदनशीलतेने  पाहण्याची गरज आहे. 

लोकशाहीत आम्ही सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा आदर करत आहेत. मात्र सदर अधिकार राज्यातील आर्थिक उलाढालीला मारक ठरू नयेत. राज्यातील पर्यटन व्यवसायातील घटकांची भरारी पथकांकडून नाहक अडवणूक व सतावणूक होते. आता तर पणजीच्या पोटनिवडणुकीमुळे ही आचारसंहिता आणखी लांबणार आहे. यामुळे पर्यटन मोसमातील मुख्य उलाढालीला निवडणुका मारक ठरू नयेत, यासाठी निवडणूक अधिकार्‍यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यभरात सुमारे 60 असे ‘नाईट क्‍लब’ आहेत, त्यांच्याकडे पहाटे 4 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याचा परवाना आहे. मात्र या क्‍लब्सना रात्रीच व्यवहार थांबवण्यास भाग पाडले जाते. ‘नाईट क्‍लब’ रात्रभर खुले राहिल्याने कुठल्या उमेदवाराच्या प्रचाराला बाधा येण्याची शक्यता आहे, तेच समजत नाही. मुंबई,  बेंगळुरू सारख्या महानगरांतील ‘नाईट क्‍लब’ आचारसंहिता कालावधीत खुले ठेवण्यास मुभा दिली जाते, मग गोव्यातच ही बंधने का, असा प्रश्‍न आम्ही निवडणूक अधिकार्‍यांना विचारला. उलट गोवा हे पर्यटन राज्य असल्याने खास मुभा द्यावी, अशी मागणी गुरूवारी सर्वच राजकीय पक्षांनी संयुक्तपणे केली आहे. ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवली जाणार असून त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्थानिक निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले असल्याचे सरदेसाई म्हणाले. 

भाजपचे प्रतिनिधी केशव प्रभू यांनी सांगितले की, राज्यातील मद्यविक्री करणार्‍या बार-रेस्टॉरंटना रात्री 11 पर्यंत कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्यातील मद्यविक्री 10 वाजताच थांबवण्यास भरारी पथकांकडून भाग पाडले जाते. ही कारवाई चुकीची असून किमान 11 वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर सहानूभुतीपूर्वक विचार करण्याचे आश्‍वासन आयोगाने दिले आहे. 

निवडणूक आयोगाने बोलावलेल्या या बैठकीला गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, काँग्रेसचे आल्तिनो गोम्स, मगोचे  कार्यकारी अध्यक्ष नारायण सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल जोलापुरे व संजय बर्डे आदी प्रतिनिधीही हजर होते.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex