Thu, Jul 02, 2020 15:27होमपेज › Goa › गोव्यात जोरदार पावसाचा इशारा

गोव्यात जोरदार पावसाचा इशारा

Last Updated: Oct 27 2019 12:29AM
गोवा : प्रतिनिधी

राज्यात बुधवारी (ता.२३) ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने राज्यात आपला मुक्काम वाढवला असून अधिक तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा वेधशाळेने 25 ऑक्टोबर रोजी रेड अलर्ट जारी केला. वीजेच्या कडकडाटासह राज्यात येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडणार असून वेधशाळने सर्तकतेचा इशारा दिला आहे. 

अरबी समुद्रात पूर्वोत्तर भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 48 तासात या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते. तसेच त्यानंतर पुढील काही तासात हे वादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यात वादळाचा काही परीणाम होणार नसला, तरी 24 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार तर 25 रोजी राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

राज्यात 25 रोजी रेड अलर्ट जारी केल्याने लोकांना सर्तक रहायचा सल्ला वेधशाळेने दिला. पुढील दोन दिवस काही ठिकाणी वीज गुल होणे, रस्त्यांवर पाणी भरणे, पडझड, वाहतूक सुविधा ठप्प होणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे लोकांनी जोरदार पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले. 

पेडणे, पणजी व काणकोण येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. पेडण्यात 42.8 मिमी, पणजीत 10.2 मिमी तर काणकोण येथे 15.4 मिमी इतका पाऊस पडला. पावसामुळे हवामान दमट होते. गोवा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कमाल तापमान 30.2 अंश सेल्सियस तर किमान तापमान 23.5 अंश सेल्सियस  इतके नोंद आहे. वातावरणात 98 टक्के आद्रता आहे. समुद्रात वादळी वारे वहात असल्याने मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.