Fri, May 29, 2020 23:00होमपेज › Goa › राफेलप्रश्नी राहुलनी जनतेची माफी मागावी

राफेलप्रश्नी राहुलनी जनतेची माफी मागावी

Last Updated: Nov 16 2019 11:12PM
पणजी : प्रतिनिधी

राफेल लढाऊ  विमानांच्या खरेदीत गैरव्यवहारप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्याने हा  व्यवहार पारदर्शक होता हे सिध्द झाले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी  जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी काल शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राफेल लढाऊ  विमानांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन  काँग्रेसने देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर खेळ करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला.

अ‍ॅड. सावईकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने  राफेलप्रश्नी दाखल करण्यात आलेली   पुनर्विचार याचिका फेटाळली.  राफेलच्या 36 लढाऊ विमानांच्या खरेदी करारात घोटाळा झाल्याचा आरोप करुन काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी  वेळावेळी  केंद्रातील  भाजप सरकारवर टीका केली. सरकारला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राफेल  लढाऊ विमान कराराव्दारे  देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न  पंतप्रधान मोदी यांनी केला.  सदर करार किती पारदर्शक आहे हे तत्कालीन संरक्षणमंत्री  मनोहर पर्रीकर यांनी देखील सांगितले होते, मात्र त्यावर पण काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करुन देशाच्या सुरक्षेच्या मुद्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र  सर्वोच्च न्यायालयाने हे दावे  फेटाळत  कराराच्या पारदर्शकतेवर शिक्कामोर्तब  केले.राफेल प्रश्नी  राहूल गांधी यांनी जनतेची  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी. भाजपने जनतेला मागील पाच वर्षात नेहमीच भ्रष्टाचारमुक्त तसेच विकासनशील सरकार दिले असे अ‍ॅड. सावईकर यांनी सांगितले.

भाजप तर्फे 27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर  दरम्यान घटनादिन साजरा केला जाणार आहे. देशपातळीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात  येणार आहे.  या निमित राज्यभरात  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. त्याचबरोबर  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश सर्वत्र पोचवला जाणार असल्याचे त्यांनी  सांगितले. यावेळी प्रदेश भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हजर होते.

मंत्री जावडेकर शब्द पाळतील
म्हादईप्रश्नी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर  नक्की बाजू  मांडतील.ते दिलेला   शब्द  पाळतील असा विश्वास भाजपचे माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केला. म्हादईबाबत कर्नाटकला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरण दाखला  देण्यात आल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिल्लीत मंत्री जावडेकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी याविषयी बाजू मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते दिलेला शब्द पाळतील.  म्हादईचे पाणी गोव्यालाच मिळावे ही  आपली भूमीका भाजपने नेहमीच स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.