Tue, Sep 17, 2019 04:02होमपेज › Goa › फेस्त फेरीतील साहित्य खरेदीसाठी झुंबड

फेस्त फेरीतील साहित्य खरेदीसाठी झुंबड

Published On: Dec 04 2018 1:29AM | Last Updated: Dec 03 2018 11:35PMपणजी : प्रतिनिधी

‘गोयचो सायब’ म्हणून जगभरातील भाविकांच्या मनात वसलेले  सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्त सोमवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात पार पडले. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकांची फेस्तला गर्दी उसळली होती. यंदा फार्मेलीनचा विषय गाजत असल्याने फेस्तच्या फेरीत फार्मेलीनवरील कांतारा ऐकू येत होती.   फेस्तच्या फेरीतील साहित्य खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत आहे.

गोमंतकीयांना दरवर्षीप्रमाणे फेस्तनिमित्ताने रोजगार संधी मिळाल्या. फेस्तच्या निमित्ताने लोकांनी विविध दुकाने थाटलेली आहेत. प्रार्थनेनंतर ‘फेस्तच्या फेरी’ला लोकांनी गर्दी केली. खाजे, चणे फुटाणे, लाडू, अशा खाद्य पदार्थांबरोबरच कपडे, चप्पल, बॅगा व घरकामातील इतर आवश्यक गोष्टींची दुकाने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी थाटली आहेत. 

लहान मुलांना आकर्षण ठरणारी खेळण्याच्या दुकानेही मोठ्या प्रमाणात आहेत. उशा, गालिचे, आकर्षक सजावटी फुलांचे गुच्छ व सजावटीचे इतर साहित्यांनी दुकानेही सजली आहेत. 
फेस्तातील चणे, शेंगदाणे विकणार्‍या विक्रेत्यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत चणे शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. यंदा 120 रूपये ‘पड’ या दराने चणे, शेंगदाणे विकले जात आहेत. फेस्त म्हटले की भाविक आवर्जून चणे, शेंगदाणे खरेदी करतात. परंतु सर्व भाविक दरवर्षी चणेफुटाणे घरी नेत असल्याने किमान 20 ते 30  रुपयांची पुडी बांधून आम्ही विकतो. फेस्तनिमित्त विक्रीही मोठ्या प्रमाणात होते.  यंदा खाजेदेखील बरेच महागले असून पाव किलो खाज्याचे पाकीट 70 रुपयाला तर 200 रूपये किलो विकले जात आहे. इतरही बर्‍याच नवीन गोष्टी फेस्तमध्ये पहायला मिळत आहेत. 

भाविक क्रिस्तन फर्नांडिस म्हणाले, की  दरवर्षी  कुटुंबासमवेत गोयच्या सायबाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही कुटुंबासमवेत  फेरीत खरेदीसाठी फिरतो. सर्व प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने एकत्रित सर्वांसाठी खरेदी होते. घरात हव्या असलेल्या गोष्टींपासून ते कपडे व खाद्यपदार्थापर्यंत सर्व वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता येते.

फेस्तला दुकाने मांडणारे हे बहुतेक व्यवसायिक पारंपरिक असून गेली पंचवीस ते तीस वर्षे ते या ठिकाणी आपला व्यवसाय करतात.सायबासाठी लागणारी मेणबत्ती व फुले विकणार्‍यांचा यात समावेश आहे. सायबाचे फेस्त म्हणजे त्यांची मोठी कमाई असते. पुढील काही  दिवस फेस्ताला भाविकांची गर्दी पहायला मिळणार आहे.
 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex