Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Goa › प्रस्तावित बसतिकीट दरवाढ अमान्य

प्रस्तावित बसतिकीट दरवाढ अमान्य

Published On: Jan 10 2019 1:44AM | Last Updated: Jan 10 2019 1:44AM
पणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारने सुमारे पाच वर्षांनी प्रस्तावित  केलेली बस तिकीट दरवाढ  बसमालकांना फारशी लाभदायक  नसल्याने तिला विरोध केला जाणार आहे. वाढती महागाई, विमा हप्ता, इंधनाचे दर, टायर , कर आदी लक्षात घेता बस व्यवसाय चालवणे कठीण आहे. यामुळे सदर तिकीट दरवाढ राज्यपत्रात अधिसूचित केल्यानंतर त्यावर अन्य सदस्यांसोबत चर्चा करून प्रसंगी न्यायालयात जाऊ,असे अखिल गोवा बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी सांगितले. 

ताम्हणकर म्हणाले, की बसमालक संघटनेने वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांना सध्याचे आणि पाच वर्षापूर्वी असलेले विविध कर आणि बस व्यवसाय चालवण्यासाठी लागणार्‍या साहित्याचे दरांचे पत्रक दिले होते. दोन्ही वर्षातील महागाईचा विचार करता ठराविक टप्प्यासाठी 5 रुपये दर देण्याची मागणी केली होती.  आम्ही 0 ते 3 किमी अंतरासाठी   8 रुपयांवरून किमान तिकीट दर 10 रु. दर ठरवण्यास सांगितले होते. त्यानंतर 4 ते 8 किमी. या टप्प्यासाठी 5 रु.  आणि  9 किमी.च्या पुढील प्रत्येकी 8 किमी. च्या टप्प्यासाठी 5 रु.  तिकीट दर निश्‍चित करण्याची मागणी केली होती. या प्रस्तावित दरवाढीमुळे बस तिकीटांमध्ये सरसकट 5 रुपये  वाढ होण्याची आशा होती. मात्र आमचे प्रस्तावित दर   मान्य  न करता सरकारने आम्हाला आर्थिक संकटात ढकलले आहे. 

पाच वर्षांपूवी डिझेलचा दर सुमारे 50 रु. प्रतिलिटर होता. तो आता 70 रु. झालेला आहे. याशिवाय, बसचा वार्षिक 40 हजारांचा असलेला हप्ता आता 90 हजार रुपयांवर पोचला आहे.  वाहतूक खात्याचे वाढते कर व अन्य शुल्क, टायर, ऑईल, मेकॅनिक, चालक, पेटींगचे चढते दरामुळे बसमालकांचे कंबरडे मोडले गेले असून हा धंदा नुकसानीत चालवावा लागत आहे. या धंद्यात तग धरण्यासाठी  तिकीट दर आणखी वाढवण्याची आमची मागणी असून त्यासाठी गरज पडल्यास आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ, असा इशारा ताम्हणकर यांनी दिला आहे. 

वाहतूक खात्याने मंगळवारी काढलेल्या अधिसूचनेनुसार, आता  पहिल्या 0 ते 4 किमी. टप्प्याच्या अंतरासाठी किमान दर 10 रु. तर 4 किमी पुढील प्रत्येक  8 किमीच्या टप्प्यासाठी 5 रुपये याप्रमाणे तिकीट दर आकारला जाणार आहे.यामुळे सिटी बसेसचे किमान भाडे 10 रु. होणार असले तरी ठराविक पल्ल्याच्या बसेसना तिकीट दरवाढीतून फारसा नफा मिळणार नसल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.