Fri, May 29, 2020 21:51होमपेज › Goa › मांडवीतील कॅसिनो स्थलांतरासाठी  तीन पर्यायी जागांचा प्रस्ताव

मांडवीतील कॅसिनो स्थलांतरासाठी  तीन पर्यायी जागांचा प्रस्ताव

Last Updated: Feb 05 2020 2:30AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

मांडवी नदीतील सहा ऑफ शोअर कॅसिनोंचे स्थलांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून बंदर कप्तान खात्याने सदर कॅसिनो स्थलांतरीत करण्यासाठी मांडवी, जुवारी आणि शापोरा या तीन नद्यांतील ठिकाणांचा पर्याय सरकारला अहवालाद्वारे दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विचारलेल्या अ-तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तरात म्हटले आहे  की, मांडवी नदीत ‘एमव्ही कॅसिनो रॉयल’, ‘एमव्ही प्राईड ऑफ गोवा, ‘एमव्ही रॉयल फ्लोटेल’, ‘एमव्ही हॉर्स शू कॅसिनो’, ‘एमव्ही आरगोसी-4’ आणि ‘एमव्ही लकी सेव्हन’ हे सहा अ‍ॅाफ शोअर कॅसिनो आहेत.

या सहा कॅसिनोंचे स्थलांतर करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी राज्यात योग्य जागेचा पर्याय सुचवण्याचे काम बंदर कप्तान खात्याकडे देण्यात आले आहे. बंदर कप्तान खात्याने गोव्याच्या आंतरभागातील जलवाहतूक अधिकारक्षेत्रात सदर कॅसिनो स्थलांतरीत करता येतील, असे आपल्या अहवालात नमूद केले आहे.मांडवीतील ऑफशोअर कॅसिनो स्थलांतरीत करण्यासाठी तीन जागांचा पर्याय खात्याने सरकारला सुचवला आहे.

यात, आग्वाद खाडीजवळ सिकेरी नदीच्या दक्षिण भागात आणि आग्वादच्या पश्चिमेकडे कॅसिनो स्थलांतरीत करता येईल. मात्र, या दोन्ही ठिकाणी पावसाळ्यात समुद्रखवळलेला असतो. त्यामुळे पावसाळा वगळता अन्य काळात तिथे कॅसिनो राहू शकतात. त्यामुळे या भागात कॅसिनो स्थलांतरीत केले तरी पावसाळ्यात कॅसिनो पुन्हा मूळ स्थानी आणणे भाग पडणार असल्याचे खात्याने अहवालात नमूद केले आहे.

जुवारी नदीच्या पात्रात आणि आगशीकडील कोकण रेल्वेच्या पुलापासून पूर्वेला 3 कि.मी. अंतरावर कॅसिनो स्थलांतर करण्यास वाव आहे. या जागी एक कि.मी.च्या अंतरात 5 ते 9 मीटर खोली आहे. मात्र, जुवारी नदीतील दोन्ही पुलांची उंची कमी असल्याने कॅसिनोवर ग्राहकांना नेण्यासाठी लहान बोटींचा वापर करावा लागणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शापोरा नदीत ऑफ शोअर कॅसिनो स्थलांतरीत करण्याचा शेवटचा पर्याय उपलब्ध असून मात्र यासाठी शापोरा नदीच्या7 कि.मी. लांबीच्या मुखाजवळ साचलेला गाळ काढण्यासाठी सुमारे 24 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. याशिवाय, सदर प्रस्तावित तीन जागांभोवताली साधनसुविधा आणि अन्य सोयी उभारण्यासाठी आणखी खर्च सरकारला करावा लागणार आहे. या सर्व जागांचे बंदर कप्तान खात्याने सर्वेक्षण केले असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय, वास्को जवळील चिखली खाडीचा भागही स्थलांतरासाठी चांगला असला तरी मुरगाव पतन न्यासच्या अधिकारक्षेत्राखाली तो येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘तारीख पे तारीख’

 मांडवी नदीतील सहा ऑफ शोअर कॅसिनोंचे स्थलांतर राज्य सरकारने 2015 पासून एकूण नऊवेळा लांबणीवर टाकले आहे. यात, 30 ऑगस्ट 2015, 1 एप्रिल 2016, 1 एप्रिल 2017, 1 जुलै 2017, 1 ऑक्टोबर 2017, 1 एप्रिल 2018, 1 ऑक्टोबर 2018, 1 एप्रिल 2019 आणि 1 ऑक्टोबर 2019 अशा मुदती जाहीर करण्यात आल्या होत्या. अगदी अलिकडे 31 मार्च 2020 पर्यंत कॅ सिनो स्थलांतरीत केला जाणार असल्याची तारीख सरकारने जाहीर केलेली असल्याची माहिती विधानसभेतील उत्तरात नमूद आहे.