Mon, May 25, 2020 09:33होमपेज › Goa › खड्डे बुजविण्याला, सुरळीत वीज, पाणी पुरवठ्याला प्राधान्य

खड्डे बुजविण्याला, सुरळीत वीज, पाणी पुरवठ्याला प्राधान्य

Last Updated: Nov 06 2019 1:44AM
पणजी: प्रतिनिधी:

राज्यातील सर्व मतदारसंघातील विकासकामांना तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणे , पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील विकासकामांची यादी  संबंधित खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांकडून  सादर करण्याची सूचना आपण दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  मंगळवारी 
दिली.

आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  भाजप आमदारांची मासिक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री  पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की सदर बैठक ही भाजप संघटनेची नियमित घेण्यात येणारी मासिक बैठक असून आता ही काहीशी उशिरा घेण्यात आली आहे. या बैठकीत भाजपाचे ४-५ वगळता सर्व आमदारांनी हजेरी लावली होती. आमदारांनी आपापल्या मतदारसंघात होणार्‍या नियोजित विकासकामांमध्ये काय अडचणी आहेत त्या सांगितल्या व त्या कशा पद्धतीने सोडवाव्यात यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनीही या बैठकीत भाग घेतला होता. बैठकीनंतर पत्रकारांकडे अनौपचारिकरीत्या बोलताना ते म्हणाले, की भाजपाची पक्षबांधणीचे आणि बूथ पातळीवरील नेते नेमण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे काम प्रत्येक मतदारसंघात जोरात सुरू असून येत्या १२ वा १३ डिसेंबर पर्यंत भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. 

या पदासाठी कुणाही इच्छुकांचे नाव अजूनही पुढे आलेले नसून पक्ष कार्यकर्तेच प्रदेशाध्यक्ष निवडणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यात येणार असून त्याआधी सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

रस्त्यातील खड्डे आठ दिवसात बुजविणार ः पाऊसकर
राज्यात नव्याने स्थापन करण्यात येणार्‍या हॉटमिक्स प्रकल्पाचे काम नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. सध्या राज्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले असून आठ दिवसात सर्व खड्डे बुजवले जाणार आहेत. यासाठी राज्याला वर्षाला ५० हजार टन डांबराची आवश्यकता असून त्यासाठी आखाती देशातून डांबर आयात करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मुंबई अथवा मंगळूरहून डांबर आयात करण्याचा आणि आखातातून डांबर आयात करण्याचा खर्च जवळपास तेवढाच आहे. मात्र, आखाताहून दर्जेदार डांबर प्राप्त होणार असून आयात  डांबराची एमपीटीच्या जवळपास साठवणूक करण्याचा सरकार प्रयत्न  असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले.