Mon, Jul 06, 2020 04:31होमपेज › Goa › बंद मोडून काढण्यास राज्यात प्रशासन सज्ज

बंद मोडून काढण्यास राज्यात प्रशासन सज्ज

Published On: Jan 09 2019 2:09AM | Last Updated: Jan 09 2019 2:09AM
पणजी :  प्रतिनिधी

कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी (दि.9) होणारा गोवा बंद मोडून काढण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. एस्मा लागू करण्याबरोबरच प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून कदंब महामंडळाकडून अतिरिक्‍त बसेस  तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनीं दिली. 

दरम्यान, या बंदमध्ये  खासगी बस संघटना, टॅक्सी संघटना, फेरीबोट कर्मचारी, कदंब कर्मचारी संघटना सहभागी होणार असून त्यांनी त्यासंदर्भात संबंधित व्यवस्थापनांना नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांनी संपाची नोटीस बजावली आहे. संपाच्या  पार्श्‍वभूमीवर शाळांना मात्र सुटी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतूकदार संघटनांकडून देण्यात आलेली संपाची हाक ही बेकायदेशीर असल्याचे वाहतूक खात्याने  स्पष्ट केले आहे.कदंब कर्मचार्‍यांनी संपाची नोटीस दिली असली तरी   कदंबच्या बसेस सूरु राहणार असल्याचे व्यवस्थापनाकडून  कळवण्यात आले आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सकाळी 6 ते  रात्री 8 वाजे दरम्यान  हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. याशिवाय कदंब महामंडळ तसेच वाहतूक खात्याच्या  संकेस्थळावर देखील प्रवाशी संपर्क साधू शकतात,असे कळवण्यात आले आहे.

सुरळीतपणे वाहतूक करणार्‍या  वाहनचालकांना अडचण निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी दिला असून कदंबकडून  400 हून अधिक  बसेस राज्यातील विविध भागांमध्ये कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जे टॅक्सीचालक या बंद मध्ये सहभागी न होता वाहतूक सुरु ठेवणार आहेत, त्यांना गरज पडल्यास  पोलिस संरक्षण दिले जाणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार असल्याने त्यांनी कुठलीही भीती न बाळगता वाहतूक सुरु ठेवावी. याशिवया रेंट अ कॅब, गोवा माईल्स टॅक्सी सेवा ही कार्यरत असेल असे वाहतूक खात्याने पत्रकान्वये कळवले आहे.