Fri, May 29, 2020 21:49होमपेज › Goa › प्रो-टेम सभापती नियुक्‍तीच्या हालचाली : गिरीश चोडणकर

प्रो-टेम सभापती नियुक्‍तीच्या हालचाली : गिरीश चोडणकर

Published On: May 05 2019 12:56AM | Last Updated: May 05 2019 12:56AM
पणजी : प्रतिनिधी

विधानसभेचे उपसभापती असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रो-टेम सभापती नियुक्‍तीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या जवळच्या आमदाराला प्रो-टेम सभापती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपसभापती असताना प्रो-टेम सभापतींची निवड ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रो-टेम सभापतींची निवड करू नये. तसेच यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, प्रो-टेम सभापती निवडीसाठी प्रयत्न सुरू नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.    

चोडणकर म्हणाले, मंत्री विश्‍वजित राणे यांच्यावर अपात्रता याचिका दाखल केली आहे. ते अपात्र व्हावेत म्हणूनच प्रो-टेम सभापती नियुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राणे व सावंत एकाच पक्षातील असले तरी एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. सावंत यांना राणे आपले प्रतिस्पर्धी वाटतात. राणे आपले मुख्यमंत्री पद हिरावून घेतील, अशी भीती सावंत यांना आहे. पद राखण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. 

सभापती तसेच उपसभापतींनी राजीनामा दिल्यास प्रो-टेम सभापती नेमण्याची मुभा आहे. प्रो-टेम सभापती हे एक संविधानिक पद आहे. त्यामुळे सभापती किंवा उपसभापती असताना प्रो-टेम सभापती नेमण्याची कसलीच तरतूद संविधानात नाही. सभापती किंवा उपसभापतींचा मृत्यू झाल्यास हे पद रिक्त ठेवता येत नाही, अशा वेळी प्रो-टेम सभापती नेमला जातो. सभापतीचे सर्व अधिकारही प्रो-टेम सभापतीला मिळत नाहीत. प्रो-टेम सभापतींना मर्यादित अधिकार आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले. 

भाजपने वेळोवेळी लोकांचा घात केला आहे. मगोपने भाजपला पाठिंबा दिला. परंतु भाजपने रातोरात त्यांचेच आमदार पळविले. चौकीदार रात्रीचे आमदार चोरुन नेतात. सरकारला पाठिंबा दिलेले विजय सरदेसाई आपल्या तिन्ही आमदारांना एकटे सोडत नसून विदेश दौर्‍यांवरही आमदारांना सोबत घेऊन फिरतात, असे चोडणकर म्हणाले.