Wed, Jul 08, 2020 14:02होमपेज › Goa › सरकारी नोकर्‍यांत गोमंतकीयांना प्राधान्य द्यावे

सरकारी नोकर्‍यांत गोमंतकीयांना प्राधान्य द्यावे

Published On: Jul 02 2019 2:01AM | Last Updated: Jul 01 2019 11:33PM
पणजी : प्रतिनिधी  

गोव्यात नोकर्‍या मिळणे हा गोमंतकीयांचा अधिकार आहे. बेरोजगारी ही राज्याचीच नाही तर सर्व देशाची समस्या बसली आहे. प्रत्येक नागरिकाला जिथे तो राहतो, त्या ठिकाणी नोकरी मिळायला हवी. गोव्यातील लोकांना आज नोकरीच्या शोधात अन्य राज्ये, विदेशात जावे लागते. सरकारने नोकर्‍यांसाठी गोमंतकीयांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी गायिका हेमा सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

सरदेसाई म्हणाल्या, नोकर्‍यांसाठी लोकांना अन्य राज्य, देशात जावे लागत आहे. राज्यात बिगर गोमंतकीयांना नोकर्‍या मिळतात. मात्र, गोमंतकीयांसाठी नोकर्‍यांचा अभाव आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे.  

इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे म्हणाले, की बेरोजगारी हा फार गंभीर मुद्दा आहे. गोमंतकीय नोकरीसाठी अशा प्रकारे गोवा सोडायला लागले तर गोव्याची तसेच लोकांची वाईट परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.   

साखरदांडे म्हणाले, की  राज्यात अनेक ठिकाणी झाडे तोडली जात आहे. या झाडाच्या कत्तली विरोधात 17 जून रोजी सांत इनेज येथे आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र आलो होतो. तसेच सुरावली येथे 40 माडांची कत्तल करण्यात आली.  राज्यातील झाडांची कत्तल थांबवावी, या मागणीसाठी सोमवारी मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना भेटलो. त्यावेळी  मुख्यमंत्री सावंत यांनी  झाडे वाचविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालावे

सोशल मीडियावर आज काल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावताना लोकांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जाते. हे चुकीचे असून त्याला काही तरी सीमा हवी. नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे भारतीय संविधानाचे कलम 19 अ मध्ये दुरुस्ती आवश्यक आहे. या संदर्भात आपण पंतप्रधानांना निवेदन सादर करणार आहे.
- हेमा सरदेसाई, गायिका