Wed, May 27, 2020 05:48होमपेज › Goa › ‘मगोप’च्या सांताक्रुज गट समिती अध्यक्षांचा राजीनामा

‘मगोप’च्या सांताक्रुज गट समिती अध्यक्षांचा राजीनामा

Published On: Jun 05 2019 1:28AM | Last Updated: Jun 05 2019 1:28AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सांताक्रुज गट  समितीचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी समितीच्या अन्य 28 सदस्यांसह मंगळवारी  आपल्या पदाचा राजीनामा दिला. ‘मगोप’ चा सांताक्रुझ मतदारसंघाच्या विकासासाठी काहीच पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे सदस्यांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला मान देऊन आपण राजीनामा दिला आहे, असे प्रकाश नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

नाईक म्हणाले, ‘मगोप’मध्ये सुदिन ढवळीकरांसाठी आपण थांवलो होतो. मात्र, मतदारसंघात विकास तसेच युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मगो चा काहीच पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे सांताकु्रझ च्या विकासासाठी मगो गट  समितीच्या अध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला आहे. यापुढे नविन समिती तयार करून, स्वतंत्र सदस्य वाढवून सांताक्रुझचा विकास व्हावा, यासाठी कार्य करत राहणार आहे.   

‘मगो’च्या या सांताक्रुझ गट   समितीत एकूण 40 सदस्य होते. यातील 28 सदस्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या व्यतिरिक्त सुमारे 2 हजार 500 कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. या पुढे कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर विचार झालेला नाही. परंतु, लवकरच आम्ही या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेणार असून समितीचे सदस्य जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही पुढे पाऊल उचलणार, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

सुरेश वेरेकर म्हणाले, प्रकाश नाईक यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. ते ज्या पक्षात जातील आम्ही त्यांच्यासोबत असू. मतदारसंघात आम्हाला विकास अपेक्षित असून मगो च्या पदाधिकार्‍यांकडून पाठिंबा न मिळाल्याने आम्ही राजीनाम्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, प्रकाश नाईक  हे मेरशी पंचायतीचे विद्यामान पंच आणि  माजी सरपंच आहेत. 2017 मध्ये त्यांनी मगो च्या तिकीटवर सांताक्रुज मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. पत्रकार परिषदेत आनंद होबळे व समितीचे अन्य सदस्याही उपस्थित होते.