Thu, May 28, 2020 06:34होमपेज › Goa › फोंडा नगराध्यक्षपदी प्रदीप नाईक 

फोंडा नगराध्यक्षपदी प्रदीप नाईक 

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMफोंडा ः प्रतिनिधी 

फोंडा पालिकेसाठी  ‘भाजप-मगो’ची पुन्हा युती झाली असून नगराध्यक्षपदी ‘मगो’चे प्रदीप नाईक तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे विश्‍वनाथ दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक  घोषणा होणार आहे,अशी माहिती बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. 

ढवळीकर म्हणाले,  राज्यात भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड व अन्य पक्षाचे सरकार असल्याने फोंडा पालिकेची भाजप मगोची पुन्हा  5 वर्षांसाठीची युती झाली आहे. गेल्या पालिका मंडळाप्रमाणे यावेळी चुका होणार नसून सर्वांना विश्‍वासात घेऊनच योग्य निर्णय घेण्यात येणार आहेत. पालिका मंडळाने घेतलेल्या विकास कामाची सर्व कामे करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे फोंड्यात ‘ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अपूर्णावस्थेत असलेल्या मलनिःसारण प्रकल्पाचे कामही लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

पालिका निवडणुकीत केतन भाटीकर यांनी  महत्वाची कामगिरी बजावली असून नवीन पालिका मंडळ सोपो कर प्रश्‍न , मार्केट कॉम्प्लेक्स, इंदिरा मार्केट, मलनिःसारण व अन्य प्रकल्पाचे काम विश्‍वासात घेऊनच करणार आहे. तसेच नवीन  प्रकल्प राबविताना विद्यमान नगरसेवक तसेच पालिका निवडणुकीत  पराभूत झालेल्यांना सुद्धा विश्‍वासात घेऊन कामे करणार असल्याचे मंत्री ढवळीकर म्हणाले. 
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा  खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले,की  फोंडा पालिकेत स्थिर मंडळ राहण्यासाठी भाजप व मगोची युती करण्यात आली असून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड होणार आहे. 

या पत्रकार परिषदेस  प्रदीप नाईक, विश्‍वनाथ दळवी, केतन भाटीकर, अनिल नाईक, शांताराम  व अन्य ‘मगो’चे नगरसेवक उपस्थित होते.