Wed, Jul 08, 2020 12:24होमपेज › Goa › पणजी मार्केटची वीज पुन्हा तोडण्याची शक्यता

पणजी मार्केटची वीज पुन्हा तोडण्याची शक्यता

Last Updated: Oct 18 2019 1:49AM
पणजी : प्रतिनिधी
पणजी मार्केटच्या थकीत वीज बिलाच्या एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये पणजी महानगरपालिकेने अद्यापही वीज खात्याकडे जमा केले नसल्याने वीज खात्याकडून मार्केटची वीज पुन्हा तोडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पणजी मनपाने 1 कोटी रुपये भरण्यासाठी वीज खात्याकडे 15 ऑक्टोबरपर्यंतची वेळ मागितली होती. मात्र, 16 ऑक्टोबर ही तारीख उलटली तरी अजूनही ही रक्‍कम जमा करण्यात आलेली नाही.

पणजी नव्या मार्केटचे वींज बिल थकले असून बिलाची रक्‍कम 5.80 कोटी रुपयांवर पोहचली आहे. त्यावर कारवाई करीत वीज खात्याने मार्केटची वीज जोडणी या महिन्याच्या सुरवातीस तोडली होती. सुमारे चार दिवस मार्केट अंधारात राहिल्यानंतर मनपाने वीज खात्याला 15 ऑक्टोबरपर्यंत थकीत वीज बिलाच्या एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये भरण्यात येतील, असे आश्‍वासन दिल्यानंतर मार्केटची वीज पुन्हा जोडण्यात आली होती.

मात्र, दिलेल्या मुदतीत मनपाने वीज खात्याकडे 1 कोटी रुपये जमा केलेले नाहीत. वीज खात्याने मनपाला आणखीन मुदतवाढ देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे मार्केटची वीज पुन्हा तोडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले, मनपाकडून मार्केटमधील दुकानदारांसोबत नव्याने भाडेकरार केला जाणार आहे. भाडेकराराच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी दुकानदारांनी मनपाकडे 15 दिवसांची मुदत मागितली आहे. भाडेकरारावर सही करण्यास सुरवात होताच मनपा वीज खात्याकडे 1 कोटी रुपये जमा करेल, असे त्यांनी सांगितले.

मार्केटमधील दुकानदारांकडून मनपाला सुमारे 2 कोटी रुपये थकीत भाडे येणे आहे. थकीत भाडे दुकानदारांना चार हप्त्यांमध्ये भरण्यासाठी एका वर्षाची मुदत मनपाने दिली असल्याचेही मडकईकर यांनी सांगितले.