Wed, May 27, 2020 11:17होमपेज › Goa › मडगावच्या नगराध्यक्षपदी गोवा फॉरवर्डच्या पूजा नाईक 

मडगावच्या नगराध्यक्षपदी गोवा फॉरवर्डच्या पूजा नाईक 

Last Updated: Nov 24 2019 1:36AM
मडगाव : प्रतिनिधी
भाजपच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळूनसुद्धा काँग्रेसच्या गटाला मडगाव पालिकेचे नगराध्यक्षपद मिळवता न आल्याने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या हातून मडगाव पालिका निसटली आहे. मडगाव नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत गोवा फॉरवर्डच्या नगरसेविका पूजा नाईक यांचा एका मताने विजय झाला आहे. पूजा नाईक यांना तेरा आणि काँग्रेसच्या डोरिस टेक्सेरा यांना बारा मते मिळाली.

मतदानाला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सुरुवात झाली. बैठकीला गोवा फॉरवर्ड, भाजप, काँग्रेस आणि अपक्ष मिळून सर्व पंचवीस नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी सुरुवातीला मतदानाची पूर्ण माहिती नगरसेवकांना दिली. मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले.नगरसेविका क्लारा फर्नांडिस यांच्याकडून मतदानाला सुरुवात करण्यात आली. मतदानानंतर पूजा नाईक यांचा तेरा मते घेऊन विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.

गोवा फॉरवर्डकडे एकूण बारा नगरसेवकांचे बळ होते. त्यांना भाजपचे राजू शिरोडकर यांनी  पाठिंबा दिल्यामुळे पूजा नाईक यांना तेरा मते प्राप्त झाली. राजू शिरोडकर यांच्या पाठिंब्यामुळे पूजा नाईक यांचा निसटता विजय झाल्याचे बोलले जात आहे. पूजा नाईक यांची निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर राजू शिरोडकर हे पूजा नाईक आणि गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांसोबत होते. डोरिस यांना काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा होता. भाजपच्या नगरसेवकांनी शेवटपर्यंत आपला पत्ता उघडला नव्हता. भाजपचे पाच आणि गोवा फॉरवर्डकडून फुटलेल्या क्लारा फर्नांडिस कोणाला पाठिंबा देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर डोरिस टेक्सेरा यांच्या बाजूने भाजपने मतदान केल्याचे स्पष्ट झाले.पूजा नाईक यांचा विजय झाल्याचे जाहीर होताच भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

आपला पराभव आपल्याला मान्य आहे. मडगावच्या विकासासाठी आपण नेहमी कार्यरत असणार आहे, असे डोरिस टेक्सेरा यांनी सांगितले. नूतन नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी पुढारीशी बोलताना सांगितले की, मडगावातील कचरा समस्या तसेच नागरिकांच्या इतर मूलभूत समस्यांवर आपण जातीने लक्ष देणार आहेे. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव पालिकेत भेट देऊन नूतन नगराध्यक्षा पूजा नाईक यांचे अभिनंदन केले.