Wed, Jul 08, 2020 13:18होमपेज › Goa › पोलिसांची १३०० पदे भरणार

पोलिसांची १३०० पदे भरणार

Published On: Jul 17 2019 2:05AM | Last Updated: Jul 17 2019 2:05AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिस खात्यात पोलिसांची 1300 पदे भरली जातील. यासाठीची जाहिरात पुढील महिन्यात प्रसिध्द केली जाईल, पोलिस खात्यामधील कर्मचार्‍यांची कमतरता भरुन काढली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात दिली.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पोलिस स्थानकात कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना वरील माहिती देण्यात आली. आमदार कामत म्हणाले, मडगाव हे व्यावसायिक शहर असल्याने तेथील पोलिस स्थानक अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. 

मात्र 2005 सालापासून या पोलिस स्थानकातील कर्मचारी क्षमतेचा आढावा घेण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. या पोलिस स्थानकात कमतरता 15 हेडकॉन्स्टेबल तसेच 32 पोलिस कॉन्स्टेबलांची कमतरता आहे. त्यामुळे ही पोलिस कर्मचार्‍यांची कमतरता भरुन काढण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून किमान आयआरबी पोलिसांची तरी तेथे नियुक्‍ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा पोलिस खात्याला 10 हजार 281 पोलिसांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्ष पोलिसांची संख्या 8 हजार 135 इतकी आहे. सुमारे 119 नव्या पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. मात्र असे असले तरी जवळपास 1300 पोलिस कर्मचार्‍यांची कमतरता खात्याला भासत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांची ही कमतरता भरुन काढण्यासाठी 1300 पदे भरली जातील. यासाठी वयोमर्यादादेखील शिथील केली जाईल. पदांच्या भरती संबंधीची जाहिरात पुढील महिन्यात प्रसिध्द करुन भरती प्रक्रिया सुरु केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

मडगाव पोलिस स्थानकात मंजूर कर्मचार्‍यांची संख्या 159 असून प्रत्यक्षात तेथे 113 कर्मचारीच काम करतात. त्यामुळे तेथे कर्मचार्‍यांची कमतरता आहे. मात्र फातोर्डा येथे नवे पोलिस स्थानक उभारण्यात आल्याने कर्मचार्‍यांची विभागणी झाली आहे. मडगाव पोलिस स्थानकाच्या पोलिस कर्मचार्‍यांच्या संख्येचा आढावा घेतला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.