Thu, Jul 02, 2020 14:44होमपेज › Goa › गोवा मांस प्रकल्पावर बंदीसाठी याचिका दाखल

गोवा मांस प्रकल्पावर बंदीसाठी याचिका दाखल

Published On: Jun 12 2019 1:18AM | Last Updated: Jun 13 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प योग्य परवान्याशिवाय कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील काम बंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका गौ ज्ञान फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर गोवा मांस प्रकल्प तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय समितीलाही नोटीस बजावली आहे. 

उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 2 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. गौ ज्ञान फाऊंडेशनतर्फे ही जनहित याचिका मंगळवारी (दि.11) दाखल करण्यात आली.

उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प योग्य परवान्याशिवाय कार्यरत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालया अंतर्गत स्थापन केलेल्या केंद्रीय समितीला गोवा मांस प्रकल्प अहवाल सादर करीत नसल्याचे या जनहित याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाने 22 जून 2016 रोजी गोवा मांस प्रकल्पाला नियम घालून दिले होते. मात्र या नियमांचेदेखील प्रकल्पाकडून पालन केले जात नाही. कत्तलखाना नियम व पर्यावरणाविषयीचे कायदे व नियम गोवा मांस प्रकल्पाकडून डावलून कारभार केला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

या प्रकल्पात जनावरांची कत्तल केल्यानंतर त्यांच्या उरलेल्या अवयवांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. प्रकल्प अत्यंत अस्वच्छ स्थितीत असून कारभारदेखील बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे याचिकादाराने याचिकेत म्हटले आहे.