Tue, May 26, 2020 07:56



होमपेज › Goa › राज्यात उद्यापर्यंत जनता कर्फ्यू

राज्यात उद्यापर्यंत जनता कर्फ्यू

Last Updated: Mar 23 2020 9:51PM




पणजी : पुढारी वृत्तसेवा

‘कोरोना व्हायरस’संबंधी राज्यातील लोकांनी ‘जनता कर्फ्यू’ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘जनता कर्फ्यू’ आणखी तीन दिवस वाढवणार असल्याचे रविवारी संध्याकाळी घोषित केले. आरोग्य, पेट्रोलपंप, फार्मसी आदी अत्यावश्यक सेवा कर्फ्यूमधून वगळण्यात आल्या आहेत. येत्या 25 मार्चच्या (बुधवारी) मध्यरात्रीपर्यंत राज्यात जनता कर्फ्यू लागू असणार  आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोनाव्हायरस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या  आवाहनला अनुसरून गोव्यासह सर्व देशात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला होता. राज्यात ‘जनता कर्फ्यू’ यशस्वीरीत्या पाळण्यात आल्याचे मुख्यमत्रीं सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फोनवरून कळविले. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानंतर, यासंबंधी रविवारी संध्याकाळी जनतेला उद्देशून ‘व्हीडीओ’ संदेशात मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की राज्यातील ‘जनता कर्फ्यू’ त आणखी तीन दिवस वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून सर्व सरकारी आणि खासगी आस्थापने सोमवारपासून  25 मार्चपर्यंत बंद  ठेवण्याचे आपण आवाहन करत आहे. 
राज्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून केवळ जीवनावश्यक मालवाहतूकीस मुभा देण्यात आली आहे. यामुळे परराज्यातील येणारे पर्यटक बंद झाले असून रेल्वेसेवा बंद आहेत. राज्यात नियंत्रीत विमान वाहतूक सेवा सुरू ठेवण्यात आली असून दाबोळी विमानतळावर उतरणार्‍या प्रत्येक प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे. 

राज्यात अजूनपर्यंत एकही  ‘कोरोनाव्हायरस’चा एकही बाधित रुग्ण नाही. यापुढेही राज्यात संसर्ग होऊ नये म्हणून   ‘जनता कर्फ्यू’ 25 मार्चपर्यंत राज्यभरात वाढवत आहे. गोमंतकीयांच्या सुरक्षतेसाठी सरकारचा निर्णय सर्वांना मान्य असेल, अशी आशा व्यक्त करून सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सावंत म्हणाले. 
लोकांनी राज्यातील पोलिस, आरोग्य आणि अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांना सहकार्य कायम ठेवावे असे   आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

परराज्यात शिक्षण अथवा रोजगारासाठी गेलेले अनेक मूळ गोमंतकीय राज्यात परतले असून त्यांनी आपल्या आरोग्याची चाचणी करून स्वत:हून घरात राहून विलीगीकरणाचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.