Sun, Aug 18, 2019 07:00होमपेज › Goa › `‘अटल सेतू’वर थांबल्यास दंड

‘अटल सेतू’वर थांबल्यास दंड

Published On: Feb 12 2019 1:05AM | Last Updated: Feb 12 2019 1:05AM
पणजी : प्रतिनिधी

मांडवी नदीवरील भव्य केबल स्टेड ‘अटल सेतू’वर मधेच वाहने  थांबवून ‘सेल्फी’ घेणार्‍या वाहनचालकाांना सोमवारपासून  दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पुलावर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. कायदा मोडणार्‍यांचा अपघात वा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कमही मिळणार नसल्याने सर्व वाहनचालकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन ‘गोवा साधनसुविधा विकास महामंडळा’चे (जीएसआयडीसी)  उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केले. 

मांडवीवरील तिसर्‍या पुलाचे अर्थात अटल सेतूचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 27 जानेवारीला उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या पुलावरून नऊ दिवसांनी, म्हणजे 5 फेब्रुवारीला वाहतूक सुरू करण्यात आली. या पुलावर दुचाकी नेण्यास आणि मधे कुठेही वाहन थांबवण्यास मनाई असतानाही उद्घाटनाच्या दिवसापासून अनेक वाहनचालक पुलाच्या एका बाजूला रांगेत  वाहने  उभी करून कुटुंबीयांसमवेत फोटोसेशन करताना आढळून आले आहेत. या पुलावर 50 कि.मी. वेगमर्यादा असली तरी 60 ते 70 कि.मी. प्रति तास वेगाने वाहने जात असल्याने अपघाताचा  धोका संभवत आहे, असेही कुंकळ्येकर म्हणाले. 

कुंकळ्येकर म्हणाले की, लोकांना या पुलावर भेट देण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी नऊ दिवस देऊनही अजूनही वाहनचालक पुलाच्या मधोमध वाहने थांबवतात, हे संतापजनक आहे, अशी बेपवाई  अपेक्षित नाही. वाहतुकीचे नियम मोडून जर अपघात झाला वा कोणाचा मृत्यू झाला तर विमा कायद्यानुसार भरपाईही मिळणार नाही, याची लोकांनी जाणीव ठेवावी. प्रसारमाध्यमांतून पुरेशी प्रसिद्धी करूनही आणि पुलाच्या सुरवातीला तसेच पुलावर फोटो काढण्यास मनाईचे फलक लावूनही लोकांवर परिणाम होत नसल्याने आता कारवाई  करण्यावाचून  पर्याय नाही. 

अटल सेतूवर दोन्ही बाजूने आणि पुलाच्या मध्यभागी ‘50 कि.मी. वेगमर्यादा’, ‘नो टू-थ्री व्हिलर’ आणि ‘नो सेल्फी झोन’ असे फलक लावण्यात आले आहेत. या वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या वाहनचालकांवर सोमवारपासून (दि.11) दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, या पुलावरून ‘महामार्ग गस्त आणि नियंत्रण कक्ष’च्या पोलिस वाहनांद्वारे गस्त  सुरू झाली असून चुकार वाहनचालकांना दंड भरावा लागत असल्याचे वाहतूक उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी सांगितले.