Wed, May 27, 2020 18:33होमपेज › Goa › पणजीत 15 पासून पे पार्किंग

पणजीत 15 पासून पे पार्किंग

Last Updated: Feb 08 2020 10:13PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजीत  15 फेब्रुवारीपासून   पे पार्किंग लागू  केले जाणार आहे.   या पे पार्किंगमधून  अगोदर दुचाक्या वगळण्यात आल्या होत्या.  मात्र आता दुचाक्यांना देखील पे पार्किंग लागू करण्यात आले असल्याची माहिती पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. खबरदारी म्हणून  पे पार्किंग कंत्राटदाराकडून  मनपाने  आगाऊ 36 धनादेश घेतले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा देखील धनादेश घेण्यात आला असल्याचेही त्यांनी  सांगितले.

महापौर मडकईकर म्हणाले,  की  पणजीत चार  ठिकाणी 15 फेब्रुवारीपासून पे ़पार्किंग  सुरु केले जाणार आहे.  यात 18 जून रस्ता, आत्मराम बोरकर रस्ता, पणजी महापालिका उद्यान परिसर व  कांपाल परिसर (मिलिटरी इस्पितळ ते   आरोग्य खाते) या भागांचा समावेश करण्यात आला आहे. पे पार्किंगचे कंत्राट  जुवारकर नामक  कंत्राटदाराला देण्यात आले असून त्याच्याकडून 96 लाख रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात आली आहे.  

सोमवार  10 फेब्रुवारी रोजी  मनपा  कंत्राटदारासोबत  करार करेल.  पे 15 पार्किंगसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा कंत्राटदाराकडून उभारल्या जात आहे. यात रस्ता पेंट करणे,  दिशादर्शक फलक लावणे, पे पार्किंग बोर्ड लावणे  आदी  कामांचा समावेश असून ही  क मे लवकरच पूर्ण केली जातील.त्यानंतर  15 फेब्रुवारीपासून पे पाकिंगची अंमलबजावणी सुरू होईल, असे त्यांनी  सांगितले.
 या पे पार्किंगमधून  आधी दुचाकी वगळण्यात आली होती. मात्र आता दुचाकीसाठीही  पार्किंग शुल्क  लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  चारचाकी वाहनांना पहिल्या एका तासासाठी  20 रुपये व  त्यानंतर प्रत्येक एका तासासाठी 15 रुपये असे शुल्क लागू असेल.

दुचाकींना  पहिल्या चार तासांसाठी  4 रुपये व त्यानंतर  पुढील आठ तासांसाठी 8 रुपये असे शुल्क लागू  केले जाणार आहे.  पे पार्किंग  अधिसूचित करण्यात आलेल्या भागांतील स्थानिक रहिवाशांना  पास सुविधा दिली जाईल. पे पार्किंग कंत्राटदाराकडून  पणजी मनपाने  आगाऊ धनादेश घेतले आहेत.  त्यामुळे कंत्राटदाराने वेळेत  पार्किंग घ्यायला सुरवात केली नाही, तरी मनपाकडे त्याचे धनादेश असल्याने मनपाचे  नुकसान होणार नाही असे मडकईकर यांनी सांगितले.

पणजीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी  मनपाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत.   बेशिस्तपणे पार्क करुन ठेवण्यात आलेल्या दुचाक्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने उचलण्यात येत आहेत. याव्दारे मनपाला मागील चार महिन्यात चार लाखांचा महसूल प्राप्‍त झाला आहे.  बेशिस्तपणे पार्क करुन ठेवण्यात आलेल्या दुचाक्यांवर कारवाई केली जात असल्याने शहरात काही प्रमाणात पार्किंगला शिस्त आली आहे. मनपाकडून लवकरच  या कामाचे आऊटसोर्सिंग केले जाणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.

बंद गाड्याबाबत लवकरच निर्णय

मिरामार परिसरात असलेल्या 30 भेलपुरी गाडयांपैकी  23 गाडे मनपाकडून बंद पाडण्यात आले आहेत.  अस्वच्छता निर्माण केल्याने तसेच अन्‍न व औषध खात्याच्या नियमांचे उल्‍लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मनपा महापौर उदय मडकईकर यांनी दिली. मिरामार परिसरात सध्या केवळ पाच  भेलपुरी व दोन शीतपेयाचे   गाडे सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे गाडे बंद करण्यात आले आहे त्यांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी  सांगितले.