Thu, May 28, 2020 06:17होमपेज › Goa › गतवर्षीची ऊस बिले फेडा; अन्यथा कर्नाटकात वाहतूक रोखू

गतवर्षीची ऊस बिले फेडा; अन्यथा कर्नाटकात वाहतूक रोखू

Last Updated: Nov 26 2019 12:21AM
फोंडा : प्रतिनिधी

राज्यातील दयानंदनगर- धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम होणार नसला तरी कर्नाटकात ऊस वाहतूक करण्यासाठी आता संजीवनीसमोर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या गळीत हंगामात कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी संजीवनीला दिलेल्या उसाची उर्वरित बिले येत्या 2 डिसेंबरपर्यंत फेडा, अन्यथा गोव्यातील ऊस वाहतूक कर्नाटकात रोखू, असा इशारा खानापूर शेतकरी संघाने दिला आहे.

संजीवनी साखर कारखान्याला कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जातो. गेल्या वर्षीही कर्नाटकातील सतरा हजार मेट्रिक टन उसाचा पुरवठा संजीवनी साखर कारखान्याला झाला होता. कर्नाटकातील होन्नावर, हल्ल्याळ व खानापूर तालुक्यातून ऊस उत्पादक शेतकरी गेल्या पंचवीस वर्षांपासून हा ऊसपुरवठा करीत आले आहेत. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 3 हजार प्रतिटन ऊस बिल देण्याचे आश्‍वासन कारखान्याकडून दिले होते. परंतु गेल्या वर्षभरात शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्यात मिळून फक्त प्रतिटन 1500 रुपये मिळाले आहेत. आता उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी या शेतकर्‍यांनी सोमवारी सकाळी थेट संजीवनी सहकारी साखर कारखान्यात येऊन कारखान्याचे प्रशासक दामोदर मोरजकर यांची भेट घेऊन उर्वरित रक्कम त्वरित फेडा, असा धोषा लावला. 

संजीवनीचे प्रशासक दामोदर मोरजकर यांनी राहिलेल्या रकमेपैकी 1100 रुपये येत्या सोमवारपर्यंत देण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. त्याप्रमाणे शेतकरी सोमवारपर्यंत थांबणार असून जर ही राहिलेली ऊस बिलांची रक्कम न मिळाल्यास यंदा कर्नाटकात होणार्‍या गळीत हंगामासाठी गोव्यातून येणार्‍या उसाची वाहतूक कर्नाटकात अडवू, असा इशारा कर्नाटकातील शेतकर्‍यांनी दिला आहे. गोव्यातील ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत, त्यामुळे ऊस तोडणीला लवकरच प्रारंभ होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दयानंदनगर-धारबांदोडा येथे कार्यरत संजीवनी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम होणार नसल्याने आता गोव्यातील ऊस परराज्यात पाठवण्याखेरीज गत्यंतर नाही. सहकार खात्यातर्फे संजीवनीच्या माध्यमातून हा ऊस कर्नाटकात पाठवण्यासाठी तयारी करण्यात येत असतानाच आता गेल्या वर्षीच्या थकलेल्या ऊस बिलावरून वाहतुकीबाबत समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी संजीवनीला तेवढा निधी उपलब्ध करावा लागणार असल्याच्या प्रतिक्रिया गोमंतकीय ऊस उत्पादकांकडून व्यक्त होत आहेत.

ऊस तोडणीचे पाच कोटी गेले पाण्यात!

संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी गेल्या गळीत हंगामात 2017-18 साली कंत्राटदाराला पाच कोटी रुपये कारखान्याने दिले होते. मात्र, रकमेसह ऊसतोड कंत्राटदार गायब झाला होता. आता त्याची चौकशी कशी काय चालली आहे, कुणास ठाऊक. पण ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मात्र त्यांच्या हक्‍काचे पैसे देण्यास संजीवनीकडून चालढकल केली जात असल्याने संजीवनीत भ्रष्टाचाराला ऊत आल्याचा आरोपही ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून केला जात आहे.