Wed, May 27, 2020 18:51होमपेज › Goa › पणजीत दोन रस्त्यांवर सप्टेंबरपासून पे अ‍ॅन्ड पार्क

पणजीत दोन रस्त्यांवर सप्टेंबरपासून पे अ‍ॅन्ड पार्क

Published On: Jul 26 2019 1:48AM | Last Updated: Jul 26 2019 1:48AM
पणजी : प्रतिनिधी

पणजीतील 18 जून रस्ता आणि आत्माराम बोरकर रस्ता या दोन रस्त्यांवर सप्टेंबरपासून पे पार्किंग सुरू केले जाईल,असे  पणजीचे  महापौर उदय  मडकईकर  यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पार्किंग शुल्क गोळा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मडकईकर  म्हणाले, शहरातील पार्किंगला शिस्त आणण्यासाठी पे पार्किंग  लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  दुचाकींना   पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही. चारचाकी वाहनांना पहिल्या दोन तासांसाठी 25 रुपये शुल्क तर त्यानंतर प्रत्येक 1 तासासाठी 15 रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वीच्या पे पार्किंग कंत्राटदाराकडून मनपाची फसवणूक झाल्याने नव्या कंत्राटदाराकडून सर्व सोपस्कार पूर्ण केले जातील असे त्यांनी सांगितले.

पे पार्किंग संदर्भातील निविदा प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करून सप्टेंबरपासून ते लागू केले जाईल. त्याचबरोबर ज्या रस्त्यांवर डबल पार्किंग केले जाते. तेथील वाहनांना क्‍लॅम्पिंग केले जाईल. यासाठी वाहतूक पोलिसांना मनपाकडून  200 क्‍लॅम्प देण्यात आले आहेत. त्याचबरोबर बेशिस्तपणे पार्क केल्या जाणार्‍या दुचाकीही उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मनपाकडे  दुचाकी उचलण्यासाठी वाहन नसल्याने या दुचाकी उचलण्यासाठी  वेळ पडल्यास कंत्राटही जारी केले जाईल. पणजीत रोज कॅसिनोच्या कर्मचार्‍यांच्या  सुमारे 600 दुचाकी पार्क केल्या जातात. या दुचाकी पाटो येथील बहुमजली इमारतीत पार्क करण्याचे निर्देश  त्यांनी देण्यात आले होते. परंतु यासाठी अजूनही गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली नसल्याचे मडकईकर यांनी सांगितले.