होमपेज › Goa › परराज्यातील रुग्णांना शुल्क भरावे लागणारच

परराज्यातील रुग्णांना शुल्क भरावे लागणारच

Published On: Nov 15 2017 1:47AM | Last Updated: Nov 14 2017 11:48PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

आपण गोव्याचा आरोग्यमंत्री आहे, महाराष्ट्राचा नाही. गोव्यातील लोकांचे हित जपणे आपले कर्तव्य असून परराज्यातील रुग्णांना गोव्यातील उपचारांसाठी वेगळे शुल्क भरावेच लागणार. महाराष्ट्रातील रुग्णांना गोव्यातील इस्पितळांत मोफत उपचार हवे असल्यास त्यांच्या सरकारने आमच्या सारखी एखादी आरोग्य विमा योजना सुरू करून त्याचा ‘काउंटर’ आमच्या इस्पितळांमध्ये उभारावा, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पर्वरी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

गोव्याबाहेरील रुग्णांकडून शुल्क आकारणीबाबत आपण ठाम असल्याचे नमूद करताना राणे म्हणाले की, गोमंतकीय रुग्णांना बेळगावच्या ‘केएलई’ इस्पितळात गेल्यास दयानंद विमा योजनेचा लाभ देण्यासाठी स्वतंत्र खिडकी उघडण्यात आली असून  गोवेकर त्याचा वापर करू शकतात. अशीच योजना महाराष्ट्र आरोग्य मंत्र्यांनी केल्यास आपली काहीही हरकत नाही. महाराष्ट्र राज्याची जर आरोग्य सेवेचा खर्च देणारी सेवा असेल तर त्यांना वेगळी खिडकी उघडण्यास संधी दिली जाणार आहे. त्यांचे कार्ड असेल तर ते स्वाईप करून गोमेकॉत उपचार घेतल्यास आपली काहीही हरकत असणार नाही.

आपल्यावर कितीही दबाव आला तरी परराज्यातील रुग्णांना वेगळी रांग व शुल्क लावण्याच्या निर्णयापासून मागे हटणार नाही. आपल्याकडे कोणीही शुल्क कमी करण्याबाबत बोलणी करण्यासाठी आले नाही. हा निर्णय जाचक नसून माफक शुल्क  लागू केले जाणार आहे. परप्रांतीयांना महागडे दर लागू करण्याची भीती काहीजण घालत असून त्यात तथ्य नाही, असे राणे यांनी सांगितले.