Fri, May 29, 2020 22:23होमपेज › Goa › पर्रीकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचणे आवश्यक

पर्रीकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचणे आवश्यक

Published On: Mar 21 2019 12:57AM | Last Updated: Mar 20 2019 11:25PM
पणजी : प्रतिनिधी 

स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे ‘राष्ट्रपुरूष’ होते, त्यामुळे यांच्याविषयी अनेक गोष्टी खास आहेत. पर्रीकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचायला हवेत. त्यासाठी पर्रीकरांच्या विविध छटा व आठवणी गोमंतकीयांनी कागदावर उतरवाव्यात. या आठवणींचे पुस्तकरूपात प्रकाशन करण्याचा सरकारचा विचार आहे. हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 
पणजी शिगमोत्सव समितीतर्फे गोमंतकाचे लाडके नेते स्व. मुख्यमंत्री मनोहरभाई  पर्रीकर यांना श्रध्दांजली देण्यासाठी बुधवारी आझाद मैदानावर आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.  वीजमंत्री नीलेश काब्राल, समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, महापौर उदय मडकईकर, सिध्दार्थ कुंकळ्येकर व अन्य उपस्थित होते. 

‘वैष्णव जन तो’ या भजनाने श्रध्दांजली कार्यक्रमाला सुरूवात झाली. उपस्थितांनी एक मिनिट शांतता पाळून स्व. पर्रीकर यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पर्रीकर यांच्या विषयी बोलताना आपल्याला रडू कोसळले. ते आपल्यासाठी काय होते हे आज कुणाला सांगूनही कळणार नाही. आज आपण जे काही त्याचे श्रेय केवळ  पर्रीकर यांनाच जाते. आयुष्यात जोकीम उचलायला पर्रीकर यांनी शिकवले.  पर्रीकर म्हणजे, शिक्षण, स्मार्ट सिटी, विकास या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यांनी साधनसुविधा व मनुष्य विकासाला प्राधान्य दिले. लोकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व योजना त्यांनी लागू केल्या. 

नीलेश काब्राल म्हणाले, पर्रीकर आपल्यात नाहीत यावर विश्‍वास बसत नाही. राज्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. जनतेसाठी काम केले तरच जनता जवळ करणार , ही शिकवण पर्रीकरांनी आपल्याला दिली. पर्रीकर हे आमच्यासाठी सदैव प्रेरणास्थान राहणार. श्रीनिवास धेंपो म्हणाले, पर्रीकरांनी मांडलेल्या प्रत्येक मतात तर्क असायचा. सुरूवातीला पर्रीकरांचे विचार आपल्याला पटत नव्हते. मात्र, त्यांची दूरदृष्टी व तत्वनिष्ठा पाहून त्यांचे विचार अचूक आहेत हे कळायला लागले. पर्रीकरांनी कायम देश व राज्याचा विचार केला व निस्वार्थी मनाने जगले. शिक्षण हा त्यांच्या मनाच्या सर्वात जवळचा विषय होता. शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नरत राहिले.  

कुंकळ्येकर म्हणाले, गोमंतकीयांच्या मनात पर्रीकरांनी वेगळा ठसा उमटविला. समोरच्या माणसाला अचूक ओळखायची दृष्टी पर्रीकरांना होती. त्यांच्या प्रत्येक बोलण्यात गहन अभ्यास व प्रत्येक निर्णयामागे कारण असायचे. राज्य व देशाचे हीत लक्षात घेऊनच ते निर्णय घ्यायचे. पर्रीकरांच्या जाण्याने राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. पर्रीकर सदैव गोमंतकीयांच्या ह्दयात राहतील, यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले. शेवटी, सर्वांनी स्व.मनोहर पर्रीकर यांच्या फोटोला पूष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.