Wed, May 27, 2020 18:18



होमपेज › Goa › पर्रीकरांची बदनामी दुर्दैवी

'पर्रीकरांची बदनामी दुर्दैवी'

Published On: Apr 16 2019 2:16AM | Last Updated: Apr 16 2019 2:16AM




पणजी : प्रतिनिधी

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर  हयात नसताना खोटारडापणा करून त्यांचे नाव बदनाम करणे दुर्दैवी आणि असंवदेनशील आहे. निधनानंतर केवळ राजकीय लाभासाठी  पर्रीकरांवर  टीका करणे, हा पर्रीकर व गोव्याच्या जनतेचा अपमान आहे,  अशा शब्दांत पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर येथे  बोलताना  तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर परीर्र्कर यांना फ्रान्सकडून होणारा राफेल लढाऊ विमानांचा करार पसंत नव्हता, त्यामुळे ते संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात परतले होते, असा दावा केला होता. या वृत्तामुळे देशभर खळबळ माजली असताना, या पार्श्‍वभूमीवर उत्पल पर्रीकर यांनी शरद पवार यांना पत्र लिहून पर्रीकरांच्या निधनानंतर होणारी टीका शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची असंवेदनशीलता दर्शवणारी असल्याच्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

उत्पल पर्रीकर यांनी पत्रात म्हटले आहे की, आपले वडील मनोहर पर्रीकर यांच्याविषयीचे आपले विधान वाचून आपल्याला आणि कुटुंबाला अपार दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी धादांत खोटे बोलून वडिलांचे नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे.

स्व. मनोहर पर्रीकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे व चांगले निर्णय घेतले. राफेल लढाऊ विमान खरेदीच्या करारामध्येही पर्रीकर यांची मुख्य भूमिका होती. एक माजी संरक्षणमंत्री म्हणून आपल्या शूर सैनिकांना शस्त्रसज्ज करण्याचे किती महत्त्व आहे, हे आपण जाणत असाल, अशी आपणास खात्री आहे. आपल्या सशस्त्र दलांना बळकटी देण्याच्या प्रयत्नात अडथळा आणण्यासाठी खोडसाळ  प्रचार  सुरू असून आपणही त्याचे भाग झालात, हे क्लेषदायी आहे. एक ज्येष्ठ आणि सन्माननीय राजकारणी म्हणून देशातल्या जनतेला आपल्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, असे उत्पल यांनी पत्रात नमूद केले आहे. 

उत्पल पर्रीकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, आपले वडील आजाराचा सामना करत असताना जे साधी विचारपूस करायचीही तसदी घेत नाहीत, त्यांनी राजकीय चिखलफेकीसाठी त्यांचे नाव घ्यायला सुरुवात करावी, हे दुःखदायक आहे. आपण अशा वक्तव्यांपासून दूर रहावे आणि मनोहर पर्रीकर यांच्यावर प्रेम करणार्‍या गोवा आणि देशातील जनतेला शांतपणे त्यांच्या निधनाबद्दल शोक करू द्या, असे  आवाहन उत्पल पर्रीकर यांनी शरद पवार यांना केले आहे.