Fri, May 29, 2020 23:01होमपेज › Goa › पर्रीकर प्रशासन चालवतात, हा भाजपचा दावा खोटा

पर्रीकर प्रशासन चालवतात, हा भाजपचा दावा खोटा

Published On: Oct 22 2018 1:44AM | Last Updated: Oct 22 2018 12:52AMपणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारचे प्रशासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या निवासस्थानाहून चालवत असल्याचा भाजपचा दावा खोटा आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे अन्य कोणीतरी फाईली मंजूर करत आहे. यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटून त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्या स्वाती केरकर यांनी दिली.

येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केरकर म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री पर्रीकर सध्या अज्ञातवासात असल्यासारखे दिसत असून सरकार अस्तित्वातच नसल्याचे आढळून येत आहे.     
सरकारातील रोजगार बंद करण्यात आला असून सरकारी खात्यांमध्ये जनतेची कामे खोळंबलेली आहेत. शिक्षण खात्याचा कारभार रसातळाला गेला आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारली असून ते घरातून फाईली मंजूर करत असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी  लोकांच्या समोर येणे आवश्यक असून त्यामुळे जनतेला दिलासा मिळेल. या मागणीसाठी आणि पर्रीकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे भेटण्यासाठी वेळ देण्याची मागणी करणार असून ती मिळेल, अशी आशा आहे. 

केरकर म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांचे  एक ‘ओएसडी’ सरकारातील अनेक खात्यातील कर्मचार्‍यांना त्रास देत असून भाजपात सामील न झाल्यास त्यांना दूरस्थ ठिकाणी बदली करण्याच्या  धमक्या देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा लेखी तक्रारी आल्यावर त्या ‘ओएसडी’ चे नाव उघड केले जाणार आहे. प्रवक्ते उर्फान मुल्ला म्हणाले, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी गतसाली विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजप सरकार पुन्हा स्थापन झाल्यास त्याला जनतेचा शाप भोवणार असल्याचे म्हटले होते. त्यांचे हे विधान आता सत्यात उतरले असून त्याला तेच स्वत: कारणीभूत आहेत. सरदेसाई यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपबरोबर हातमिळवणी करून सरकार स्थापन केले असून त्यांचा शाप त्यांनाच भोवणार आहे.