Wed, May 27, 2020 05:33होमपेज › Goa › पणजीत रस्ते, पदपथांची दुर्दशा; प्रशासनाचे दुर्लक्ष

पणजीत रस्ते, पदपथांची दुर्दशा; प्रशासनाचे दुर्लक्ष

Last Updated: Nov 12 2019 1:29AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात सुवर्ण महोत्सवी इफ्फी अवघ्या 10 दिवसांवर येऊन  ठेपला असून शहरात रंगरंगोटी सुरू आहे. मात्र  शहरातील  रस्ते व पदपथांच्या झालेल्या  दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष  होत आहे. खडबडीत रस्त्यांवर वाहन चालकांना धोका पत्करावा लागतो, त्याचप्रमाणे पादचार्‍यांना पदपथांवरून चालत जाणे धोक्याचे ठरते. या गोष्टींकडे पणजीच्या महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया रहिवाशांतून व्यक्त होत आहे.

पावसाळा संपल्यानंतर शहरांबरोबर सर्व ठिकाणच्या  खड्डेमय रस्त्यांची ठेकेदारांकडून स्वखर्चाने दुरूस्ती केली जाईल,असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिले होते. मात्र पावसाने  उघडीप देऊन  आठवडा उलटला असला तरी ठेकेदारांकडून अद्याप  खड्डेमय रस्त्यांच्या दुरूस्ती कामाला सुरूवात झालेली नाही. राजधानीतील 18 जून मार्ग, आत्माराम बोरकर मार्ग, सांतइनेज, आल्तीन परिसर, मळा, पणजी बसस्थानक परिसर व शहराच्या मध्यवर्ती भागातील अंतर्गत रस्ते पावसाळ्यात उखडलेले आहेत. या रस्त्यांवरून दुचाकी चालकांना कसरती करून दुचाकी चालवाव्या लागतात. तसेच वाहन चालकांची रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गोची होते. राजधानीत इफ्फीचा सुर्वणमहोत्सवी उत्सव जवळ आलेला असताना सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्त्यांची दुरूस्ती केली जात नसल्यामुळे रहिवाशांतून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय 18 जून मार्गावरील बाँबे बाझारपासून सांतइनेजच्या वाहतूक बेटापर्यंत गुजरात लॉज समोर पदपथावरील फरशा उखडून पडलेल्या आहेत. त्याच पदपथावर काही ठिकाणी चेंबर्स खचलेली असून पदपथाची   घसरण आहे. एका ठिकाणी दुकान मालकाने    बांधकाम करून पदपथाची जागा अडवलेली आहे. फार्मसी महाविद्यालयाजवळ पदपथावरील बर्‍याच लाद्या उखडलेल्या असल्याने पादचारी त्यात पाय अडकून पडतात. यामुळे पादचार्‍यांना 18 जून मार्गाच्या बाजूला असलेल्या पदपथावरून चालत  जाणे बरेच कठीण बनलेले आहे.   मळ्यातून कदंब बस स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर  उभारण्यात आलेल्या पाटो पुलाच्या दुतर्फा असलेला पदपुलाचा भाग एका बाजूने उखडलेला असून पादचार्‍यांना त्यावरून चालून जाणे धोक्याचे बनलेले आहे. तसेच पदपथावर असलेल्या लोखंडी ग्रील्सचा खांब तुटल्यामुळे पादचार्‍यांना  धोका संभवतो. तर त्याच पुलावरून पुढे कदंब बसस्थानकाकडे जाणारा रस्ता पावसामुळे पूर्णपणे उखडलेला आहे. पणजी राजधानीच्या या दुर्दशेकडे राज्य प्रशासन व महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते.

पणजी शहरास दरदिवशी देशविदेशीतील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात,त्या पर्यटकांनाही पदपथांवर चालताना त्रासदायक ठरत असून स्मार्ट सिटी यादीत असलेल्या पणजीची नाचक्की होत आहे, अशा प्रतिक्रिया शहरातील रहिवाशांतून व्यक्त होत आहेत.