Thu, May 28, 2020 05:34होमपेज › Goa › प्रतिस्पर्ध्यांचे आक्षेप फेटाळून ढवळीकरांची उमेदवारी ग्राह्य

प्रतिस्पर्ध्यांचे आक्षेप फेटाळून ढवळीकरांची उमेदवारी ग्राह्य

Published On: Apr 06 2019 1:45AM | Last Updated: Apr 06 2019 1:45AM
फोंडा : प्रतिनिधी

शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मगो पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेल्या पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर यांच्या उमेदवारीला  आक्षेप घेतलेले दोन्ही अर्ज फोंडा उपजिल्हाधिकारी तसेच निवडणूक अधिकारी केदार नाईक यांनी फेटाळून लावले. या आक्षेपासंबंधी वादी व प्रतिवादीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, निवडणूक अधिकार्‍यांनी शुक्रवारी निकाल देताना उमेदवारी ग्राह्य धरल्याने दीपक ढवळीकर यांचा शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दीपक ढवळीकर यांनी दाखल केलेली उमेदवारी 
सदोष असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष शिरोडकर तसेच फॉरवर्ड डेमोक्रेटिक लेबर पार्टीचे उमेदवार हरिश्‍चंद्र नाईक यांनी घेतला होता. उमेदवारी छाननीच्यावेळी हा आक्षेप आल्यानंतर दीपक ढवळीकर यांच्या उमेदवारीसंबंधी सुनावणी घेण्यात आली. दीपक ढवळीकर तसेच सुभाष शिरोडकर व हरिश्‍चंद्र नाईक यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यात दीपक ढवळीकर यांची उमेदवारी ग्राह्य असल्याचा आदेश निवडणूक अधिकार्‍यांनी दिला. 

भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी आक्षेप घेताना उमेदवारी अर्जावर पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष स्वाक्षरी करू शकत नसल्याचे नमूद केले होते. तर फॉरवर्ड डेमोक्रेटिक लेबर पार्टीचे हरिश्‍चंद्र नाईक यांनी मगो पक्षाचे दोन तृतीयांश आमदार फुटून गेल्याने मगो पक्ष अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट होत असल्याने मगोपच्या तिकिटावर निवडणूक लढवणे अवैध असल्याचे म्हटले होते.

यासंबंधीच्या सुनावणीवेळी दोन्ही वादी व प्रतिवादींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करताना न्यायालयीन निवाड्याचे विविध दाखले दिले. मगो उमेदवाराच्या उमेदवारीवर कार्यकारी अध्यक्ष नारायण सावंत यांनी स्वाक्षरी केल्याने त्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, मगो पक्षाच्या घटनेत कार्यकारी अध्यक्षाला सही करण्याचा अधिकार असल्याचे दीपक ढवळीकर यांच्या वकिलाने नमूद केले. त्यामुळे दीपक ढवळीकर यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला. 

दुसर्‍या आक्षेपात मगो पक्ष अस्तित्वात नसल्याचे म्हटले होते, त्यासंबंधी युक्तिवादावेळी पक्षाचे दोन तृतियांश आमदार फुटून भाजपवासी झाले तरी ते विधिमंडळ गटाशी निगडित असल्याने मगोच्या मुख्य समितीशी त्यांचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले. हा युक्तिवादही ग्राह्य धरल्याने दीपक ढवळीकर यांच्या विरोधातील आक्षेप फेटाळून निवडणूक अधिकार्‍यांनी उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मगो पक्षातर्फे अ‍ॅड. नंदकुमार नाईक यांनी युक्तिवाद केला तर विरोधात अ‍ॅड. जितेंद्र सुपेकर व अ‍ॅड. अभिजीत गोसावी यांनी युक्तिवाद केला.