Fri, May 29, 2020 21:46होमपेज › Goa › पणजी पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा : सुभाष वेलिंगकर

पणजी पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा : सुभाष वेलिंगकर

Published On: Apr 13 2019 1:54AM | Last Updated: Apr 13 2019 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी पोटनिवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहे, मात्र, अंतिम निर्णय पक्ष समिती घेईल, असे गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गोवा सुरक्षा मंच पक्षाने पणजी पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून यासाठी तीन इच्छुक उमेदवारांच्या  नावांची यादी पक्षाने तयार केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पणजी पोटनिवडणूक उमेदवाराचे नाव आठवड्याभरात जाहीर केले जाईल. भाजपच्याद‍ृष्टीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची लढत आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करून पक्ष पुढील कृती ठरवेल, असे त्यांनी  सांगितले. 

वेलिंगकर म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा राजकीय वारसा चालवण्यास  भाजपमध्ये  अनेक  इच्छुक आहेत.  तर पर्रीकरांबद्दलच्या सहानुभूतीतून पणजी पोटनिवडणुकीत मते प्राप्‍त होतील, असे  भाजपला वाटत आहे. त्यामुळेच पर्रीकरांचा राजकीय वारस  म्हणून त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांचा वापर करण्याचा घाट भाजपने  रचला आहे.

पर्रीकरांनी राजकारण व कुटुंबीय यांची कधीच सरमिसळ वा गल्लत केली नाही. त्यांनी  आपल्या मुलांना राजकारणापासून दूर ठेवले. मात्र, भाजप  स्वार्थासाठी  उत्पल पर्रीकर यांच्यावर दबाव टाकून त्यांचा वापर करू पहात असून ते अयोग्य  असल्याचे त्यांनी  सांगितले.

गोवा सुरक्षा मंच हा स्वच्छ व तडजोड न करणारा प्रादेशिक पक्ष आहे. मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तिन्ही  पोटनिवडणुका तसेच उत्तर गोवा व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात मिळून आपण स्वतः 170 कोपरा बैठका घेतल्या असून मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे    वेलिंगकर यांनी  सांगितले.

यावेळी पक्षाचे संघटनमंत्री संदीप सामंत, राज्य महिला प्रमुख अ‍ॅड. रोशन सावंत, अभय सावंत हे उपस्थित होते.