Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Goa › पणजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी

पणजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 22 2019 11:56PM
पणजी : प्रतिनिधी

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली. या अधिसूचनेनुसार, येत्या 19 मे रोजी मतदान होणार असून 23 मे रोजी लोकसभा आणि अन्य तीन पोटनिवडणुकीसोबत पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. 

पणजीचे आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाल्याने पणजीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव सुमित मुखर्जी यांनी सोमवारी पणजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्यासाठी 29 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 30 मे रोजी अर्जांची छाननी होणार असून 2 मे रोजी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर, 19 मे रोजी मतदान होणार असून 23 मे रोजी लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि पोटनिवडणुकीच्या चार जागांसाठीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया 27 मे रोजी संपुष्टात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. पणजी मतदारसंघ हा गेली 24 वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने उत्पल मनोहर पर्रीकर यांना उमेदवारी दिली 

जाण्याचे संकेत दिले असून उत्पल यांनी लोकसभेच्या आणि अन्य तीन पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. माजी मंत्री तथा ताळगावचे तत्कालीन आमदार बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘आप’चे वाल्मिकी नाईक, ‘गोसुमं’चे प्रा. सुभाष वेलिंगकर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. यामुळे पणजी पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.