Wed, Jul 08, 2020 13:34होमपेज › Goa › कॅसिनोंविरोधात पणजीत मंगळवारी निदर्शने

कॅसिनोंविरोधात पणजीत मंगळवारी निदर्शने

Published On: Jun 16 2019 1:44AM | Last Updated: Jun 16 2019 1:44AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा कॅसिनोमुक्‍त होणे गरजेचे आहे. कॅसिनोंंच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा निर्णय निषेधार्ह असून त्याविरोधात आम आदमी औरत अगेन्स्ट कॅसिनो या संघटनेतर्फे 18 जून रोजी म्हणजेच क्रांतिदिनी पणजीत आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कॅसिनोंविरोधात पणजी येथील आझाद मैदानावर 18 जून रोजी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान आंदोलन केले जाईल. गोवा कॅसिनोमुक्‍त होईपर्यंत लढा सुरूच ठेवला जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मार्टीन्स म्हणाल्या की, कॅसिनो हटवणार नाही, कॅसिनोंच्या माध्यमातून गोवा पर्यटनाची जाहिरात केली जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. कॅसिनोंबाबत सरकारचे धोरण जनविरोधी आहे. कॅसिनो हा जुगाराचाच भाग आहे. राज्यात गोवा जुगार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. जुगार तसेच त्याच्या जाहिरातीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. मात्र सरकारच कायदा डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारने कॅसिनो त्वरित मांडवीतून हटवावेत. कॅसिनोंमुळे वेश्या व्यवसाय, मद्यपान, गुंडगिरी, चोरी, आत्महत्या आदी प्रकारांना चालना मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कॅसिनोंमुळे गोमंतकीयांना रोजगार प्राप्‍त होत असल्याची विधाने सरकारकडून केली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कॅसिनोंमध्ये मोजकेच गोमंतकीय लोक कामाला असल्याचे मार्टीन्स यांनी सांगितले. कॅसिनोंकडून राजकारणी तसेच राजकीय पक्षांना निधी दिला जातो. त्यामुळेच ते कॅसिनोंचे बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर करू पहात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी संघटनेच्या सदस्या, अनामिका, पुष्पा, रशिदा व अफ्रु शेख उपस्थित होत्या.

‘त्या’ संकेतस्थळाविरुद्ध तक्रार

‘हुक ट्रॅव्हल्स.कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून गोव्यात वेश्या व्यवसायासाठी मुली उपलब्ध आहेत. या, मजा करा अशी जाहिरात केली जात असल्याचा आरोप आम आदमी औरत अगेन्स्ट कॅसिनो या संघटनेच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स यांनी केला. या विरोधात पोलिस तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी त्याची दखल घेऊन या संकेतस्थळाविरोधात एफआयआर नोंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली.