Mon, May 25, 2020 04:39होमपेज › Goa › पणजी : शिवसेनेच्‍या उपेंद्र गावकरांचा भाजप प्रवेश 

पणजी : शिवसेनेच्‍या उपेंद्र गावकरांचा भाजप प्रवेश 

Published On: Apr 18 2019 6:31PM | Last Updated: Apr 18 2019 6:12PM
पणजी : प्रतिनिधी 

शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी गुरूवारी (ता.१८) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या पणजीतील मुख्यालयात भाजपचे उपाध्यक्ष अनिल होबळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिरगाव, मये  येथील उपेंद्र गावकर यांचा भाजपमधील प्रवेश जाहीर करून त्यांचे पक्षात स्वागत केले. गावकर यांच्या प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत झाला असून जोमाने कार्य करण्यासाठी पक्षाला बळकटी मिळाली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. 

सावंत म्हणाले, उपेंद्र गावकर हे मये मतदारसंघातील कार्यकर्ते असून ते भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे महासचिव देखील आहेत. गावकर यांचे अन्य कार्यकर्ते मये येथून भाजपमध्ये प्रवेश करणार असून पक्षाचे  कार्य सुरू करणार आहेत. लोकसभा व पोटनिवडणुकीच्या पाचही जागा भाजप जिंकणार आहे. तसेच पणजीतील पोटनिवडणूकही भाजपच जिंकणार, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 

उपेंद्र गावकर म्हणाले, आपण शिवसेनेसाठी यापूर्वी कार्य केले. त्यानंतर आपण २०१० रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र,  काही गोष्टी पटत नसल्याने काँग्रेसची साथ सोडली.  गेली काही वर्षे आपण कोणत्याही पक्षात नव्हतो, मात्र लोकांसाठी कार्य सुरूच होते. या काळात भाजपशी फार जवळचा संबंध होता. आज भाजपसोबत नाते दृढ झाले असून पुढे पक्षासाठी होईल तितके काम करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

बाबुश यांनी न बोललेलेच बरे: मुख्यमंत्री  सावंत 

बाबुश मोन्सेरात यांनी गुरूवारी आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीवासियांना नोकर्‍या दिल्या नाहीत, अशी टीका केली. या टीकेवर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, स्व. पर्रीकर हे राज्याचे मुख्यमंत्री होते, कुणा एका खात्याचे मंत्री नव्हते. पर्रीकरांनी पणजीत केलेला विकास सर्वांनाच माहीत आहे. तसेच नोकर्‍या योग्यतेच्या बळावर मिळतात. बाबुश यांनी या विषयावर काही न बोललेलेच बरे. हेच उत्तर त्यांना पुरेसे आहे, असे सावंत यांनी प्रत्युत्तरात सांगितले.