Mon, May 25, 2020 03:25होमपेज › Goa › मंत्री लोबो, आजगावकर वादात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई

मंत्री लोबो, आजगावकर वादात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई

Last Updated: May 08 2020 2:06AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर आणि बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो या दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर बोलावून आपसातला वाद मिटविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी आम्ही दोघे मित्र असून आपल्यातील वाद हे केवळ घरगुती भांडण होते, असे सांगून वाद मिटला असल्याचे पत्रकारांना सांगितले. 

पेडणे तालुक्यात एक पोलिस निरीक्षक उघडपणे लाच घेत असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी बंदर कप्तान मंत्री लोबो यांनी केली होती. त्यावर पलटवार करताना पर्यटनमंत्री आजगावकर यांनी कळंगूट मतदारसंघात ड्रग्सचा व्यापार वाढला त्याकडे लोबो यांनी लक्ष द्यावे, पेडण्यात लक्ष घालू नये, असे उत्तर दिले होते. दोघांमधील वाद वाढत असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील वातावरण चांगले नसल्याचे चित्र लोकांसमोर जात असल्याने अखेरीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन्ही मंत्र्यांना गुरुवारी आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर बोलावून घेतले. दान्ही मंत्र्यांनी आपले मत पत्रकारांकडे      
न मांडता आपल्याकडे मांडण्यास सांगितले. कोरोनाच्या विरोधातील लढ्यात सर्व मंत्रिमंडळ एकसंध राहणे महत्वाचे असल्याने त्यांना वाद मिटवण्यास सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले की, आपण आजगावकर यांच्याविरोधात काहीही टीका केली नाही. आपण एका विषयाबाबत टिपणी केली असता त्यावर आजगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हा दोघांमध्ये काहीही वाद नसून आम्ही दोघे मित्र आहोत. आजगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी आपण हंगामी सभापती म्हणून स्वागत केले होते. त्यांना त्रास देण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता.

आजगावकर यांनीही लोबोंच्या म्हणण्याला दुजोरा देताना सांगितले की, आमच्यामध्ये जे झाले, तो कौटुंबिक वाद होता. कुठल्याही कुटुंबात लहानसहान वाद होत असतात. याचा अर्थ आम्ही एकमेकांचे दुश्मन झालो असा होत नाही. आम्हा सर्व मंत्र्यांना गोव्यापुढे असलेल्या आव्हानाला तोंड द्यायचे असून राज्य पुढे न्यायचे आहे.