Mon, May 25, 2020 10:33होमपेज › Goa › पणजीचा ‘कॉम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ पंधरवड्यात खुला

पणजीचा ‘कॉम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ पंधरवड्यात खुला

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 1:02AMपणजी : वसंत कातकर

पणजी शहर ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी ‘कॉम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ (सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा) येत्या 15 दिवसांत नागरिकांना सूचना व शिफारशींसाठी खुला केला जाणार आहे. पणजीत 2-3 पार्किंग प्लाझा उभारणे, शहरांतर्गत आणि अन्य शहरांमधली वाहतूक व्यवस्था, कॅफे भोसले चौकात ‘सेमी पेडेस्ट्रीयन’ (पादचारी) विभाग, विजेवर चालणार्‍या सायकली व अन्य विषयांबाबतची माहिती खुली केली जाणार आहे, अशी माहिती गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. 

देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यासाठी केंद्राकडून अनुदान मिळणार असून या यादीत पणजी शहराचा समावेश आहे. यासाठी ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’ या नोडल एजन्सीतर्फे कामे सुरू झाली आहेत. पणजीतील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील नागरिकांनी दुचाकी वा चारचाकी वापरण्याऐवजी चालत अथवा सायकलने जावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शहरात सुमारे 60 सायकलींचे स्टँड उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात आता 20 ठिकाणी सदर स्ँटड बांधण्यात येणार आहे.

या स्टँडवरून तासासाठी अथवा दिवसभर, आठवडा वा महिनाभरासाठी सायकली भाड्याने दिल्या जाणार आहेत. पणजीत उंच- सखल भाग असल्याने या सायकली पॅडल आणि विजेवर चालणार्‍या आहेत. या सायकली चार्जिंग करण्यासाठी सदर स्टँडवर सोय केली जाणार असून कुठूनही सायकली भाड्याने घेऊन कुठल्याही अन्य स्टँडवर परत करता येतील, अशी तरतूद या योजनेत आहे. या सायकल स्टँडबाबतची निविदा गेल्या आठवड्यातमागवण्यात आली असून अंतिम कंत्राटदार आठवड्याभरात निवडला जाणार असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

पणजीत रस्त्यांचे जाळे कमी असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.  पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसत असून अनेक रस्त्यांवर चारचाकी आणि दुचाकी  यांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. चारचाकी वाहने ‘डबल पार्किंग’ केली जात असल्याने वाहन चालकांना कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. यासाठी शहरातील पार्किंगचा ‘मास्टरप्लॅन’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी नागरिक आणि समाजसेवी संस्थांना हा आराखडा सूचना देण्यासाठी खुला केला जाणार आहे. कोणत्या रस्त्यावर  पार्किंग असावे, कुठल्या मार्गावरून मोठ्या वा छोट्या बसेसची रहदारी असावी, अवजड वाहने कुठे व कधी आणायची आदीबाबतच्या सूचना मागवण्यात येणार आहेत. शहरात जुन्या सरकारी इमारतींच्या अथवा मोकळ्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न असून असे 3-4 प्लाझा उभारण्यात येणार आहेत. या प्लाझांमुळे वाहने पार्किंगची सोय उपलब्ध झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे कुंकळ्येकर म्हणाले. 

पणजीत ‘नो मो झोन’ (मोटर निषिध्द विभाग), म्हणजे वाहनांना   प्रवेश बंदी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता. येथील 18 जून रस्त्यावर रविवारच्या दिवशी हा प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला असला तरी स्थानिकांच्या असहकार्याने ही संकल्पना कायमस्वरूप घेऊ शकली नाही. विदेशात फक्त पादचार्‍यांसाठी खास रस्ते आणि विभागाचा वापर अत्यंत चांगल्यारितीने करण्यात आला असून त्याला पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. अशाच विभागाचा प्रयोग  पणजीत प्रथमरित्या करण्याचा मान येथील भोसले कॅफे परिसराला देण्याचे ठरविण्यात आले आहे. 

पहिला ‘सेमी पेडेस्ट्रीयन’ विभाग कॅफे भोसले परिसरात

येथील भोसले कॅफेच्या समोर तिठ्ठा असून  याठिकाणी तिन्ही बाजूने विविध प्रकारची चांगली हॉटेल्स, थिएटर, गिफ्ट आयटम्स्ची दुकाने, कार्यालये, मंदिर आदी आहेत. या  ठिकाणची रचना खास असून सर्व बाजूने रस्ते तेथे एकत्र येतात. याठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे. हा चौक  केवळ पादचार्‍यांसाठीच खुला ठेवला जाणार आहे. यामुळे या चौकात  नागरिकांना मोकळेपणे पायी  फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. चौकात मधोमध असलेल्या त्रिकोणी भागात छोटेसे उद्यान उभारले जाणार आहे. शहरातील हा विभाग लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटकांना खास आवडीचा बनण्याची शक्यता असल्याचे कुंकळ्येकर म्हणाले.

रायबंदर वीज समस्येबाबत बैठक शुक्रवारी

रायबंदर येथील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. रायबंदरमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे उभारण्यासंबंधी येत्या  शुक्रवारी (दि. 6) वीज खात्याचे अधिकारी आणि स्थानिकांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक शनिवार, दि. 7 जुलै रोजी आधी ठरविण्यात आली असली तरी त्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोेविंद  यांचे राज्यात आगमन होणार असल्याने ही बैठक शुक्रवारी अथवा रविवारी  घेण्यात येणार असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले.