Wed, Jul 08, 2020 14:11होमपेज › Goa › जाहीर प्रचाराची सांगता; मतदारांच्या भेटीवर भर

जाहीर प्रचाराची सांगता; मतदारांच्या भेटीवर भर

Published On: May 18 2019 1:43AM | Last Updated: May 19 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी विधानसभा मतदारसंघात 19 मे रोजी होणार्‍या पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता संपुष्टात आला. उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पणजीत रविवार दि. 19 रोजी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला असून 23 मे म्हणजे मतमोजणी दिवशीदेखील ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात निमलष्करी दलाचे जवान पोलिसांना साथ देत आहेत. विशेषतः संवेदनशील भागात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात दोन अपक्षांसह सहा उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बाबूश मोन्सेरात, भाजपचे सिध्दार्थ कुंकळ्येकर, गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर, आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक तसेच दिलीप घाडी व विजय मोरे या अपक्ष उमेदवारांचा त्यात समावेश आहे.

उमेदवार सहा असले तरी प्रमुख लढाई ही काँग्रेस, भाजप व गोवा सुरक्षा मंचच्या उमेदवारांमध्ये असल्याची चर्चा आहे. या पोटनिवडणुकीसाठी मागील एक महिन्यापासून कोपरा बैठका, जाहीर सभा तसेच ध्वनिक्षेपकाव्दारे प्रचार सुरू होता.

पणजीची पोटनिवडणूक भाजप व काँग्रेसने प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपतर्फे खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीत मुक्काम करून प्रचारात जोर लावला. मंत्री तसेच पक्षाचे व सहकारी पक्षाच्या आमदारांनाही प्रचारासाठी नियोजन देऊन सहभागी करून घेतले. भाजपतर्फे गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. काँग्रेसतर्फे कुणीही केंद्रीय नेता प्रचारासाठी आला नाही. प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, पक्षातील माजी मुख्यमंत्री व आमदार यांच्या सहकार्याने भाजपला तोडीस तोड प्रचार मोहीम राबवली. आपतर्फे वाहनांद्वारे प्रचारावर भर दिल्याचे आढळून आले. गोसुमंचे सुभाष वेलिंगकर यांनी प्रचाराची सांगता होताना मोठी रॅली काढून मतदारांना आवाहन केले. अपक्ष उमेदवार प्रचारात फारसे दिसून आले नाहीत. जाहीर प्रचाराची सांगता झाल्याने आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे.