Tue, May 26, 2020 06:05होमपेज › Goa › काँग्रेसच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिक

काँग्रेसच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिक

Published On: Feb 26 2019 1:16AM | Last Updated: Feb 27 2019 1:14AM
मडगाव ः प्रतिनिधी 

काँग्रेसच्या राष्ट्रीय सोशल मीडियाच्या निमंत्रक   हसीबा अमीन यांच्या इंडिया पॉलिटिकल नेटवर्क या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानच्या पाच नागरिकांचा समावेश असून,काँग्रेसच्या बहुतेक राजकारण्यांचा सहभाग असलेल्या या ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांकडून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घाणेरड्या पद्धतीने टीका टिप्पणी केली जात आहे ,असा आरोप नवी दिल्लीच्या खासदार तथा भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी केला आहे. या प्रकाराचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खुलासा करावा, अशी मागणी  केली.   मीनाक्षी लेखी या मडगावात भाजप युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना बोलत  होत्या. हसिबा अमीन या गोव्याच्या  रहिवाशी आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची काँग्रेसच्या सोशल मीडिया निमंत्रक पदी नेमणूक केली आहे. हसिबा अमिन अ‍ॅडमिन असलेला इंडिया पॉलिटिकल नेटवर्क हा राजकीय व्हॉटस्अप ग्रुप असून त्यात पाच सदस्य हे पाकिस्तानचे रहिवाशी आहेत. या ग्रुपवर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिपण्णी करत असल्याचा पुरावा आजच मिळाला आहे. या विषयी चौकशी होणे गरजेचे असून राहुल गांधी यांनीही खुलासा करावा, असे लेखी म्हणाल्या.