Tue, May 26, 2020 07:32होमपेज › Goa › राज्यात येणार्‍यांची सशुल्क कोरोना चाचणी 

राज्यात येणार्‍यांची सशुल्क कोरोना चाचणी 

Last Updated: May 18 2020 1:45AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येक प्रवाशाची कोरोनासंबंधीची चाचणी व त्यासाठी 2 हजार शुल्क भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांना ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करणे आणि स्वत:ची माहिती देणारा अर्ज ‘ऑनलाईन’ अथवा लेखी अर्ज सादर करणेही अनिवार्य करण्याचे ‘राज्य कार्यकारी समिती’ने (एसईसी) रविवारी झालेल्या बैठकीत निश्‍चित केले. 

मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखालील ‘एसईसी’च्या रविवारी झालेल्या बैठकीत प्रधान सचिव तथा विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव पुनित गोयल, वाहतूक खात्याचे सचिव एस. के. भंडारी, महसूल खात्याचे सचिव संजय कुमार तसेच वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत कोरोनाच्या चाचणी शुल्काबाबत चर्चा करण्यात आली. परराज्यातून गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांच्या कोरोनासंबंधी चाचणीचे अहवाल मोठ्या प्रमाणात ‘पॉझिटिव्ह’ येऊ लागल्याने समितीने राज्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना चाचणी आधी मोफत ठेवण्यात आली होती, मात्र ती आता सशुल्क करण्यात येणार आहे. यासाठी समितीने आंतरराज्य वाहतूक कक्षाला केंद्रीय रेल्वे आणि अन्य प्राधिकरणाला राज्यात येऊ इच्छिणार्‍या प्रत्येकाला चाचणी शुल्क बंधनकारक असल्याचे कळविले आहे

 फक्‍त ‘आयुष्यमान 

भारत प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेखाली नोंद असलेल्या व्यक्‍ती वगळता प्रत्येकाला कोरोना चाचणीसाठी 2 हजार रुपये भरावे लागणार आहेत. ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचार्‍यालाही सदर शुल्क माफ असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातून परराज्यात 29 एप्रिल-2020 पासून 17 हजार 85 जणांनी स्थलांतर केले असून 2129 लोकांनी राज्यात प्रवेश केला असल्याचे ‘एसईसी’च्या बैठकीत माहिती व तंत्रज्ञान सचिवांनी सांगितले. याशिवाय, 14 मे 2020 नंतर राज्यातून 7352 विदेशी लोकांना खास 36 विमानांतून दाबोळी विमानतळातून मायदेशी पाठवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.